राहुल गांधींनी विचारलं, शिवसेना म्हणजे काय?; संजय राऊत एका वाक्यात उत्तरले; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 08:52 PM2021-09-16T20:52:45+5:302021-09-16T20:55:56+5:30
राहुल गांधी आणि संजय राऊत यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली होती
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची काही दिवसांपूर्वी दिल्लीत भेट झाली. राज्यासह देशात या भेटीची चर्चा झाली. या भेटीनंतर राहुल आणि राऊत यांच्या एका फोटोचीदेखील सर्वत्र चर्चा होती. त्यात राहुल यांनी राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवला होता. राऊत राहुल यांना काहीतरी सांगत असल्याचं त्या फोटोतून दिसत होतं. राहुल यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल राऊत यांनी पहिल्यांदाच सविस्तर भाष्य केलं आहे.
दिल्लीत झालेल्या भेटीवेळी राहुल यांनी मला एका वाक्यात शिवसेना म्हणजे काय, असं विचारलं. त्यावर फटे लेकीन हटे नहीं, हे शिवसेनेचं धोरण असल्याचं मी राहुल यांना सांगितलं, असं राऊत म्हणाले. 'काही दिवसांपूर्वी माझी आणि राहुल गांधींची दिल्लीत भेट झाली. त्यावेळी त्यांनी मला शिवसेनेच्या रचनेविषयी, कार्यपद्धतीबद्दल विचारलं. त्यावर आम्ही एकदा रस्त्यावर उतरलो की विचार करत नाही. फटे लेकीन हटे नहीं असं असतं आमचं. आम्ही कोणाच्या पाठीत वार करत नाही, असं मी राहुल गांधींनी सांगितलं,' असं राऊत म्हणाले.
आणखी एका मुख्यमंत्र्याला नारळ? थेट मोदींनी दिल्लीत बोलावलं; तासभर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं?
शिवसेना असंख्य वार आणि घाव झेलून इथपर्यंत आली आहे. शिवसेना त्यागातून, संघर्षातून वर आलेली आहे. आतापर्यंत केलेल्या आंदोलनांच्या पुण्याईवरच शिवसेना आज उभी आहे, असं राऊत यांनी म्हटलं. शिवसेनेचा प्रचार देशभर व्हावा हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. आज राज्याचे मुख्यमंत्री देशात पहिल्या पाचात आहेत. पण शिवसेनेला राज्यात क्रमांक एकचा पक्ष करणं हेच आमचं ध्येय आहे. विधानसभेच्या १५० जागा जिंकून कोणाच्याही कुबड्यांशिवाय सरकार स्थापन करायचं आहे. काहीच नसलेल्या भाजपला १०५ जागा मिळतात. आता स्वबळावर सत्ता हवी असल्यास शिवसेनेला १५० जागा जागा हव्यात, असं राऊतांनी सांगितलं.