२०१४ नंतर देशात 'असा' वाढला ड्रॅगन; राहुल गांधींकडून आकडेवारी शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 02:19 PM2020-06-30T14:19:02+5:302020-06-30T14:22:45+5:30
मेक इंडिया म्हणायचं अन् चीनमधून विकत घ्यायचं; राहुल गांधींचा आकडेवारीसह हल्ला
नवी दिल्ली: चीनसोबतचा सीमावाद वाढत असताना, दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली असताना मोदी सरकारनं ५९ चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घातली. यावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर आकडेवारीसह निशाणा साधला आहे. २०१४ पासून देशात ड्रॅगन कसा वाढला, याची माहिती राहुल यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे.
मोदी सरकारनं काल चिनी अॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाष्य करताना राहुल यांनी गेल्या सहा वर्षांत चीनमधून होणारी आयात कशी वाढली, याची आकडेवारी ट्विट केली. 'आकडे खोटं बोलत नाहीत. भाजप म्हणतो मेक इन इंडिया. पण असं म्हणून ते चीनकडून खरेदी करतात,' असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार आणि भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात चीनकडून होणारी आयात यांची तुलना राहुल यांनी केली आहे.
Facts don’t lie.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 30, 2020
BJP says:
Make in India.
BJP does:
Buy from China. pic.twitter.com/hSiDIOP3aU
२००८ ते २०१४ या सहा वर्षांच्या कालावधीत चीनकडून होणाऱ्या आयातीचं प्रमाण १४ टक्के होतं. तेच प्रमाण भाजपप्रणित एनडीए सरकारच्या काळात १८ टक्क्यांवर गेलं. २००८ मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चीनमधून होणारी आयात १२ टक्के होती. २०१२ मध्ये ती १४ टक्क्यांवर पोहोचली. त्यानंतर २०१४ नंतर हेच प्रमाण १३ टक्क्यांवर आलं, अशी आकडेवारी राहुल यांनी दिली आहे.
'मोदींच्या नेतृत्त्वाखाली सरकार येताच २०१५ मध्ये चीनमधून होणारी आयात १४ टक्क्यांवर गेली. आयातीचं प्रमाण २०१६ मध्ये १६ टक्के, २०१७ मध्ये १७ टक्के आणि २०१८ मध्ये १८ टक्क्यांपर्यंत गेलं,' अशी माहिती राहुल यांनी दिली आहे. राहुल यांनी केलेलं ट्विट काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधींनी रिट्विट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या सातत्यानं योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील योगी आदित्यनाथ सरकारला लक्ष्य करत आहेत.