शेतकऱ्यांवर 'मित्रां'च्या कायद्याचा वार, हेच आहे मोदी सरकार; राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 03:50 PM2020-12-29T15:50:47+5:302020-12-29T16:09:18+5:30
rahul gandhi : युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार म्हणत राहुल गांधींची सरकारवर टीका
देशात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र अद्यापही टळलेला नाही. अशातच बरोजगारीचंही संकट देशासमोर उभं राहिलं आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात रोजगारात ०.९ टक्क्यांची घट झाली. त्यामुळे तब्बल ३५ लाख नोकऱ्यांवर संकट उभं राहिलं. यावरून आता काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ऑक्टोबर महिन्यातही रोजगारात ०.१ टक्क्यांची घट झाली होती.
"युवकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड, जनतेवर महागाईचा अत्याचार. शेतकऱ्यांवर मित्रांच्या कायद्यांचा वार, हेच आहे मोदी सरकार," असं म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रावर हल्लाबोल केला.
युवा पर बेरोज़गारी की मार,
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 29, 2020
जनता पर महंगाई का अत्याचार,
किसान पर ‘मित्रों’ वाले क़ानूनों का वार,
यही है मोदी सरकार। pic.twitter.com/WbmI30Ru0B
अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांचं आदोलन
गेल्या ३३ दिवसांपासून नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचं आदोलन सुरू आहे. आज या आंदोलनाचा ३४ वा दिवस आहे. दरम्यान, हे शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी शेतकरी नेते आणि सरकारमध्ये ३० डिसेंबर रोजी चर्चा पार पडणार आहे. या चर्चेसाठी शेतकरी संघटनाही तयार असल्याचं म्हटलं जात आहे. यापूर्वी शेतकरी नेत्यांकडून ही चर्चा २९ डिसेंबर रोजी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु सोमवारी सरकारकडून पाठवण्यात आलेल्या पत्रात ३० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता विज्ञान भवनात शेतकरी संघटनांना आमंत्रित करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे. २६ नोव्हेंबरपासून ४० शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.
बेरोजगारीत वाढ
ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात बरोजगारीचं प्रमाण वाढल्यानं चिंतेतही वाढ झाली आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात हा ट्रेंड कमी होईल अशी शक्यता सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं व्यक्त केली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीनं जाहीर केलेल्या अहलानुसार मागील महिन्यात ३९.९ कोटी लोकांकडे रोजगार गोता. परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यात २.४ टक्क्यांची घट झाली आहे. बाजारातील चांगल्या रिकव्हरीनंतरही मार्च २०२० पासून रोजगारात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. कमी प्रमाणात निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांमुळे लोकं श्रम बाजारातून बाहेर पडू लागले असल्याचा दावाही अहवालात करण्यात आला आहे.