राहुल गांधींनी शिवसेनेला मुद्दाम डिवचलं का?; सोनियांसह कुणालाच समजेना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 05:13 PM2019-12-16T17:13:49+5:302019-12-16T17:18:29+5:30
राहुल गांधींच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- हरीश गुप्ता
नवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांचा उल्लेख करून राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात महत्त्वाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला का दुखावले, या कोड्यात पक्षाचे नेते व हंगामी अध्यक्ष व त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी, असे सगळेच पडले आहेत.
येथील रामलीला मैदानावरील शनिवारच्या प्रचंड मोठ्या मेळाव्यात (भारत बचाओ रॅली) आपण काय बोलत आहोत याची पूर्ण जाणीव राहुल गांधी यांना होती. कारण, ते म्हणाले होते की, माझे नाव राहुल सावरकर नाही. माझे नाव राहुल गांधी असून, मी कधीही माफी मागणार नाही. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती; पण ते करणारा मी नाही. हे भगव्या रंगाचे झेंडे असणाऱ्या पक्षांना राहुल गांधी सांगत आहेत, हे तर उघडच आहे.
राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी बोलल्या. मेळाव्याचा जो उद्देश होता त्याचप्रमाणे गांधी बोलल्या व त्यांनी राहुल गांधी यांच्या त्या विधानांकडे दुर्लक्ष केले, ही बाब वेगळी. या मेळाव्यानंतर सोनिया गांधी या लगेचच परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्याशी बोलल्या, असे समजले. पडद्यामागे नंतर घडलेल्या घडामोडींमध्ये शिवसेनेचे संजय राऊत यांनी टिष्ट्वटरवर सावध प्रतिक्रिया दिली आणि या प्रकरणाची तीव्रता मंदावली.
या महामेळाव्याला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. त्याबद्दल पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांची राहुल गांधी यांनी पाठ थोपटली. मेळाव्याबद्दल आम्हाला दाद न देता वासनिक यांचे कौतुक झाल्याबद्दल काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत.
हा मेळावा यशस्वी केल्याबद्दल राहुल गांधी यांनी वासनिक यांना बोलावून घेऊन हजारो लोकांच्या उपस्थितीत त्यांची पाठ थोपटली. एवढा मोठा मेळावा यशस्वी केल्याबद्दल राहुल गांधी यांनी पक्षाच्या एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (राजस्थान), कमल नाथ (मध्यप्रदेश) आणि भूपेश बघेल (छत्तीसगड) या मुख्यमंत्र्यांनी व हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुड्डा यांनी आपापल्या राज्यांतून या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी अनेक आठवडे काम केले होते. या उलट या मेळाव्याला उत्तर प्रदेशातून मोठ्या संख्येने आलेल्या आपल्या कार्यकर्त्यांचे पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी अभिनंदन केले. प्रियांका गांधी बोलत होत्या तेव्हा हे कार्यकर्ते त्यांना प्रोत्साहन देत होते.
काय आहे खरे कारण?
आतील गोटातून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी यांनी सावरकरांचे नाव मुद्दामच घेतले, ते शिवसेनेला डिवचण्यासाठी. हा मेळावा भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (रालोआ) लक्ष्य करण्यासाठीच होता. राहुल गांधी यांनी त्या लक्ष्यापासून दूर होत शिवसेनेला डिवचले.
राहुल गांधी यांच्या जवळच्या सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना या आघाडीच्या बाजूने राहुल गांधी कधीच नव्हते; परंतु राजकीय अपरिहार्यतेमुळे सोनिया गांधी यांनी या आघाडीला मान्यता दिली. तरीही राहुल गांधी हे कधीही या आघाडीबद्दल समाधानी नव्हते आणि जेव्हा त्यांना मानहानिकारक भाष्य जाहीरपणे करण्याची संधी आली ती त्यांनी दवडली नाही.