आरक्षण वाचवण्यासाठी राहुल गांधींचा 'अवतार'; काँग्रेसचा भाजपावर पोस्टर वार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 01:00 PM2020-02-20T13:00:14+5:302020-02-20T13:02:20+5:30
पोस्टरमधून काँग्रेसचा भाजपावर निशाणा; निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा गाजण्याची शक्यता
बिहार: विधानसभा निवडणुकीला काही महिने शिल्लक असताना बिहारमध्ये पोस्टर वॉर सुरू झालं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा आढावा घेण्याची गरज व्यक्त केली होती. त्याचा फटका भाजपाला निवडणुकीत बसला होता. आता पुन्हा एकदा बिहार विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी आला आहे.
भाजपा आरक्षणविरोधी असून आरक्षण संपवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसनं वारंवार केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीदेखील अनेकदा यावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. यानंतर आता बिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा विषय तापू लागला आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाटण्यातल्या रस्त्यावर राहुल यांचे पोस्टर लावले आहेत. 'आरक्षण हटवू देणार नाही,' असा मजकूर या पोस्टरवर आहे. यामध्ये राहुल यांचा फोटो एखाद्या हिरोसारखा लावण्यात आला असून त्याखाली अवतार शब्द लिहिण्यात आला आहे.
Bihar: Poster with Congress leader Rahul Gandhi's picture and 'Aarakshan khatm nahi hone denge avtaar' written on it, put by party's local leaders, in Patna. pic.twitter.com/baV6MPCfKR
— ANI (@ANI) February 20, 2020
गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबद्दल केलेलं विधान भाजपाला महागात पडलं होतं. त्यामुळे आताही आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करुन भाजपाच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. बिहारच्या राजकारणात जातीचा, आरक्षणाचा मुद्दा कायमच संवेदनशील राहिला आहे. राज्यातले दोन महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल यांनी अनेकदा जातीवर आधारित जनगणना केली जावी, अशी मागणीदेखील केली आहे.
आरक्षणाबद्दल काय म्हणाले आहेत राहुल गांधी?
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपावर तोंडसुख घेतलं आहे. भाजपाला आरक्षण हटवायचं आहे. भाजपा संघाच्या डीएनएमध्येच आरक्षण विरोध आहे. मात्र आम्ही आरक्षण संपवू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण संपवण्याची कितीही स्वप्नं पाहिली, तरी आम्ही कोणत्याही परिस्थितीत आरक्षण संपू देणार नसल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं.