‘डबल इंजिन’मध्ये कोणत्या इंजिनला किती कमिशन?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 05:19 AM2023-05-08T05:19:39+5:302023-05-08T05:20:48+5:30
राहुल गांधी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर सवाल
बंगळुरू : कर्नाटकातील भ्रष्टाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी असा सवाल केला की, डबल इंजिन सरकारच्या प्रत्येक इंजिनला ४० टक्के कमिशनमधून किती मिळाले.
अदानी यांचा मुद्दा संसदेत उपस्थित केल्याबद्दल पंतप्रधानांनी आपल्याला खासदार म्हणून अपात्र ठरविल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी म्हणाले की, गेल्या तीन वर्षांपासून कर्नाटकात भाजपचे सरकार आहे आणि पंतप्रधानांना इथल्या भ्रष्टाचाराची माहिती आहे. तुम्ही त्याला फक्त ‘डबल इंजिन सरकार’ म्हणता. यावेळी दुहेरी इंजिन चोरीला गेले आहे. कर्नाटकातील कंत्राटदारांच्या संघटनेने पंतप्रधानांना पत्र लिहिले की, त्यांच्याकडून ४० टक्के कमिशन आकारले जाते. परंतु, मोदींनी उत्तर दिले नाही.
‘चोरी करून आले, चोरीच करणार’
राहुल गांधी म्हणाले की, तुमचे सरकार तीन वर्षांपूर्वी चोरीला गेले. चोरी करून आलेले सरकार चोरीच करणार. याला चोरीशिवाय दुसरे काही कळत नाही. वांशिक हिंसाचारामुळे ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झालेल्या मणिपूरमधील ज्वलंत परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, लोक मारले जात आहेत, परंतु पंतप्रधान किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना त्याची चिंता नाही.
भ्रष्टाचार राेखण्यासाठी काय केले?
ते म्हणाले की, पंतप्रधान येतात आणि म्हणतात की, काँग्रेसने ९१ वेळा शिवीगाळ केली. पण त्यांनी आधी कर्नाटकला सांगायला हवे की, त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी काय केले, कोणती चौकशी झाली आणि किती लोकांना तुरुंगात टाकले.
घाेटाळ्यांवरून घेरण्याचा प्रयत्न
घोटाळ्यांबाबत ते म्हणाले की, पोलिस उपनिरीक्षक, सहायक प्राध्यापक, सहायक अभियंता यांच्या भरतीमध्ये आणि प्रसिद्ध म्हैसूर सॅन्डल साबण बनविणाऱ्या कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडमध्ये प्रचंड अनियमितता झाली आहे. म्हैसूर चंदन घोटाळ्यात एका आमदाराच्या मुलाला ८ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह पकडण्यात आले आणि भाजपच्या एका आमदाराने सांगितले की, २,५०० कोटी रुपये देऊन मुख्यमंत्रिपद विकत घेता येते.