भारत जोडो यात्रेत राहुल गांधी शाळकरी मुलांसोबत धावले; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उडाला गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 11:32 AM2022-10-30T11:32:13+5:302022-10-30T11:36:24+5:30
गेल्या ५० दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गेल्या ५० दिवसापासून काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. यातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आज रविवारी पदयात्रेदरम्यान अचानक काही शालेय विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधी धावू लागले. गांधी यांच्या अचानक धावण्यामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला.
यावेळी तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी आणि इतरही धावू लागले. राहुल यांनी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसह रविवारी सकाळी जडचर्ला येथून पदयात्रेला सुरुवात केली आणि २२ किमी अंतर कापणार असल्याचे बोलले जात आहे. तेलंगणात काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’चा हा पाचवा दिवस आहे.
दहा लाख नोकऱ्यांसाठी केंद्र सरकार प्रयत्नशील; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती
रविवारच्या पदयात्रेची सांगता होण्यापूर्वी संध्याकाळी शादनगर येथील सोलीपूर जंक्शन येथे राहुल गांधी एका जाहीर सभेला संबोधित करतील. शनिवारी रात्री जडचर्ला एक्स रोड जंक्शन येथे थांबण्यापूर्वी त्यांनी २० किलोमीटरहून अधिक अंतर पायी कापले होते. ही यात्रा तेलंगणातील सात लोकसभा आणि १९ विधानसभा मतदारसंघांतून एकूण ३७५ किलोमीटरचे अंतर पार करेल, त्यानंतर ती ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करेल. ४ नोव्हेंबर रोजी यात्रेला एक दिवसाचा ब्रेक लागणार आहे.
खासदार राहुल 'भारत जोडो यात्रे' दरम्यान क्रीडा, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यक्ती तसेच विचारवंत आणि विविध समुदायातील नेत्यांना भेटणार आहेत. राहुल गांधी तेलंगणातील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरांना भेट देतील आणि तेथे प्रार्थना करतील. 'भारत जोडो यात्रा' ७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली. यात्रेचा तेलंगणा टप्पा सुरू करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये पदयात्रा काढली होती. तेलंगणा प्रदेश काँग्रेसने यात्रेच्या समन्वयासाठी १० विशेष समित्या स्थापन केल्या आहेत.