१९ वर्षांनी सोडलं राहतं घर; राहुल गांधी म्हणाले, “खरं बोलण्याची किंमत चुकवावी लागली”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 06:06 PM2023-04-22T18:06:29+5:302023-04-22T18:07:33+5:30

Rahul Gandhi News: खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी शासकीय निवासस्थान रिकामे केले.

congress leader rahul gandhi vacates official 12 tughlak lane bungalow in delhi after a month lok sabha disqualification | १९ वर्षांनी सोडलं राहतं घर; राहुल गांधी म्हणाले, “खरं बोलण्याची किंमत चुकवावी लागली”

१९ वर्षांनी सोडलं राहतं घर; राहुल गांधी म्हणाले, “खरं बोलण्याची किंमत चुकवावी लागली”

googlenewsNext

Rahul Gandhi News: २०१९ मध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाने दोषी ठरवले होते. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. या विरोधात राहुल गांधी यांनी याचिका दाखल केली होती. मात्र, सुरत सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधी यांना आपला राहता सरकारी बंगला सोडण्याची वेळ आली आहे. राहुल गांधी यांनी राहत्या घराच्या चाव्या संबंधित अधिकाऱ्याकडे सोपवल्या. यावेळी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित होत्या. 

खासदारकी गमावल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांचे शासकीय निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस मिळाली होती. त्यामुळे राहुल गांधी यांनी आपले निवासस्थान रिकामे करण्यास सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी सामानाची पहिली खेप रवाना करण्यात आली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी सर्व सामानाची आवराआवर करून सरकारी निवासस्थानाच्या चाव्या संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केल्या. 

खरे बोलण्याची किंमत चुकवावी लागली

काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी खासदारकी गमावल्यानंतर सरकारी बंगला रिकामा केला आहे. त्यांनी १२, तुघलक लेन बंगल्याच्या चाव्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्या आहेत. सत्य बोलण्याची किंमत चुकवावी लागली आहे, अशी पहिली प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली. देशातील जनतेमुळे या निवासस्थानी राहायला आलो होतो. १९ वर्षे या घरात राहिलो, असेही ते म्हणाले. तसेच राहुल गांधी यांनी जी विधाने केली ती सत्यच आहेत. सरकारच्या विरोधात बोलल्यानेच राहुल गांधींवर आज ही वेळ आली आहे. राहुल गांधी खूप धाडसी आणि संयमी आहेत. मी त्यांच्या पाठिशी आहे, असे प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहुल गांधींचे असेल वास्तव्य

आपले निवासस्थान बदलल्यानंतर राहुल गांधी त्यांची आई आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत त्यांच्या १० जनपथ या निवासस्थानी राहतील. बंगला सोडण्यापूर्वीच त्यांनी १४ एप्रिल रोजी त्यांचे कार्यालय आणि काही वैयक्तिक सामान आई सोनिया गांधी यांच्या अधिकृत निवासस्थानी शिफ्ट केले होते. तत्पूर्वी, सुरत न्यायालयाने राहुल गांधींना मानहानीच्या एका प्रकरणात दोषी ठरवून २ वर्षांची शिक्षा सुनावली होती. या निर्णयानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले. राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून खासदार होते. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, खासदार आणि आमदारांना कोणत्याही परिस्थितीत २ वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास, त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभेतून) रद्द केले जाते.

दरम्यान, भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. चार वर्षांनंतर सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी दोषी ठरवून दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. राहुल गांधी यांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळण्यात आली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: congress leader rahul gandhi vacates official 12 tughlak lane bungalow in delhi after a month lok sabha disqualification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.