मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द, लोकसभा अध्यक्षांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 02:19 PM2023-03-24T14:19:21+5:302023-03-24T15:41:33+5:30
मोदी आडनावावर केलेल्या वक्तव्यानंतर कोर्टाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
Rahul Gandhi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदारराहुल गांधी यांच्यावर लोकसभा अध्यक्षांनी मोठी कारवाई केली आहे. मोदी आडनावावर केलेल्या टीकेनंतर सूरत सत्र न्यायालयाने राहुल यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर तात्काळ जामीनही मंजूर केला. त्या निर्णयानंतर चोवीस तासांच्या आत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.
Congress party's Rahul Gandhi disqualified as a Member of Lok Sabha from the date of his conviction in the criminal defamation case over his 'Modi surname' remark, March 23. pic.twitter.com/qmr9pRTtTh
— ANI (@ANI) March 24, 2023
लोकप्रतिनिधी कायद्यानुसार, जर कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये खासदार आणि आमदारांना 2 वर्षांहून अधिकची शिक्षा ठोठावण्यात आली असेल तर त्यांचे सदस्यत्व (संसद आणि विधानसभा) रद्द केले जाते. इतकेच नव्हे तर शिक्षेची मुदत पूर्ण केल्यानंतर त्यांना सहा वर्षांपर्यंत निवडणूक लढवण्यासही बंदी घातली जाऊ शकते. याच कायद्यानुसार, राहुल गांधी यांची खासदारदी रद्द करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांच्यासमोर काय मार्ग?
खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कायदेशीर मार्ग आहे. सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राहुल गांधी वरच्या कोर्टाचा दरवाजा ठोठावू शकतात. जर वरच्या कोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय रद्द केला तर राहुल गांधी यांची खासदारकी वाचू शकते. त्यामुळे आता राहुल गांधी काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, या कारवाईनंतर काँग्रेस नेत्यांकडून सरकारविरोधात तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.
या विधानामुळे अडचणीत आले
राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात बोलताना एक वक्तव्य केले होते. 'सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?' असे राहुल म्हणाले होते. राहुल यांच्या या वक्तव्यानंतर भाजपचे आमदार पुर्निश मोदी यांनी त्यांच्यावर एक खटला दाखल केला होता. गुरुवारी सूरतच्या सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवले आणि त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. पण, राहुलला त्वरित कोर्टाकडून 30 दिवसांचा जामीन मिळाला.
सोशल मीडिया प्रोफाइल फोटो बदलले
राहुल गांधी यांच्याभोवती सुरू असलेल्या विविध वादांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने काल आपल्या सर्व सोशल मीडिया अकाउंटवरील प्रोफाइल फोटो बदलला आहे. या प्रोफाइल फोटोमध्ये राहुल गांधींचा फोटो लावण्यात आला असून, त्यावर "डरो मत" असे लिहिण्यात आले. हा फोटो ट्विटर, फेसबूक अशा सर्व सोशल मीडिया अकाउंट्सवर टाकण्यात आला आहे.