"राजकारण नको पण अशा स्थितीत त्यांनी मणिपूरला...", भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून राहुल गांधींचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 02:41 PM2023-07-01T14:41:51+5:302023-07-01T14:41:51+5:30
manipur violence latest news : दोन महिन्यांपासून हिंसाचारात होरपळले मणिपूर आताच्या घडीला देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे.
नवी दिल्ली : मागील जवळपास दोन महिन्यांपासून मणिपूर राज्यात हिंसाचाराची आग आहे. अनेक निष्पाप नागरिक यात मृत्यूमुखी पडले. मणिपूरमधील हिंसाचार रोखण्यात अयशस्वी ठरलेले राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह आज राज्यपालांची भेट घेऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू होती. पण शुक्रवारी अनेक नाट्यमय घडामोडींनतर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट केले. मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधक सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपूर दौऱ्यावरून जाऊन पीडितांची भेट घेतली.
दरम्यान, राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्यावरून देखील राजकारण चांगलेच तापले. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी या विषयावर काहीच का बोलत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. तर राहुल गांधींचा दौरा म्हणजे केवळ ड्रामा असल्याचे प्रत्युत्तर भाजपाने दिले. पण मणिपूर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा ए शारदा देवी यांनी राहुल गांधींच्या दौऱ्याचे तोंडभरून कौतुक केले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून गांधींचे कौतुक
एएनआयने या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना शारदा देवी यांनी म्हटले, "सध्याच्या परिस्थितीत राहुल गांधी यांनी मणिपूरला दिलेली भेट याचे कौतुक वाटते. तसेच ही परिस्थिती सोडवणे आणि शांतता प्रस्थापित करणे यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. या मुद्द्याचे राजकारण कोणीही करू नये."
#WATCH | Manipur | In the current situation, I appreciate Rahul Gandhi's visit to the state. However, the focus should be on solving the situation and bringing back peace. The issue should not be politicised: BJP State President, A Sharda Devi on Rahul Gandhi's visit to Manipur pic.twitter.com/OAsI4Joas1
— ANI (@ANI) July 1, 2023
"जनतेचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास"
"परिस्थिती सुधारेल असा विश्वास असल्याने जनता मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत बाहेर आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात न आल्यास हाताबाहेर जाऊ शकते, असा लोकांचा विश्वास आहे. राज्यातील सध्याची परिस्थिती ही मागील सरकारच्या कारभारामुळे ओढवली आहे. मुख्यमंत्री बीरेन यांच्या सरकारवर जनतेचा पूर्ण विश्वास आहे", असेही प्रदेशाध्यक्षा ए शारदा देवी यांनी म्हटले.
Manipur | The people have come out supporting the Chief Minister because they have faith that situation will improve. People believe that if the situation is not controlled this time, it might go out of hand. The current situation in the state is the result of the doings of the… pic.twitter.com/VZskBJYbY4
— ANI (@ANI) July 1, 2023
खरं तर मागील रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी शनिवारीच गृहमंत्री शहा यांनी मणिपूरमधील परिस्थितीबाबत १८ पक्षांची सर्वपक्षीय बैठक घेतली होती. बैठकीत सपा आणि आरजेडीने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. तसेच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही करण्यात आली होती.
कार्यकर्त्यांचा हंगामा अन् अखेर खुलासा
शुक्रवारी मुख्यमंत्री बिरेन सिंह पदाचा राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले होते. अशातच काही महिला समर्थकांनी राजभवनासमोर आंदोलन करून मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे जाऊ दिला नाही. यादरम्यान काही महिला आंदोलकांनी मुख्यमंत्र्याचे राजीनामा पत्र फाडले आणि त्यांच्या राजीनाम्यास विरोध दर्शवला. मोठ्या गदारोळानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे सिंह यांनी जाहीर केले.