Narendra Modi: पंतप्रधानांना शोधायला बंगालमध्ये जायचं का?; लोकसभेत सवाल अन् तितक्यात सभागृहात पोहोचले मोदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 04:34 PM2021-03-25T16:34:22+5:302021-03-25T16:35:16+5:30
Narendra Modi: नरेंद्र मोदी त्याचवेळी लोकसभेत पोहोचले आणि एक विरोधकांना जशास तसं उत्तर मिळालं.
लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अनोखा प्रकार पाहायला मिळाला. सभागृहाचं कामकाज संपण्यापूर्वी काँग्रेसचे नेता रवनीत सिंह यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अनुपस्थितीबाबत प्रश्न उपस्थित केला. पण नरेंद्र मोदी त्याचवेळी लोकसभेत पोहोचले आणि एक विरोधकांना जशास तसं उत्तर मिळालं. (Congress Leader Ravneet Singh Bittu Asked About Absence Of PM Narendra Modi Reached Quickly After It In Loksabha)
नेमकं काय घडलं?
लोकसभेत काँग्रेसचे खासदार रवनीत सिंह बिट्टू यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर आवाज उठवला. "लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विधेयकं मंजुर करण्यात आली. पण गरीबांचं नुकसान करणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर आणि घरगुती गॅसच्या महागाईवर कोणतीच चर्चा झाली नाही. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संपत आलं आहे. पण आम्ही आता पंतप्रधानांना कुठे जाऊन भेटायचं? पंतप्रधान आहेत कुठे? आम्ही काय आता त्यांना पश्चिम बंगालच्या निवडणूक रॅलीमध्ये जाऊन भेटायचं का?", असे सवाल उपस्थित केले.
रवनीत सिंह यांच्या या प्रश्नांवर सत्ताधारी पक्षाचे खासदार अर्जुनराम मेघवाल यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पंतप्रधान मोदी याआधी लोकसभेत उपस्थित होते आणि लोकांना भेटण्यासाठी ते सदैव उपलब्ध असतात, असं मेघवाल म्हणाले.
अचानक मोदी लोकसभेत पोहोचले
लोकसभेच्या सभागृहात जेव्हा रवनीत सिंह आणि अर्जुनराम मेघवाल यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनुपस्थितीवरुन वाद सुरू असतानाच अचनाक पंतप्रधान मोदी सभागृहात पोहोचले. मोदींचं 'टायमिंग' पाहून सत्ताधारी एकदम खूष झाले आणि 'भारत माता की जय'चा जयघोष सभागृहात सुरू झाला.
राहुल गांधीही उपस्थित
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील उपस्थित होते. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभागृहातील सर्व सदस्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांची कोरोनातून लवकर मुक्ती होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.