काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 21:35 IST2024-06-26T21:34:32+5:302024-06-26T21:35:13+5:30
लोकसभा निवडणुकीदरम्यान वादग्रस्त वक्तव्यामुळे सॅम पित्रोदा यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

काँग्रेस नेते सॅम पित्रोदा परतले; पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड
Sam Pitroda : लोकसभा निवडणुकीवेळी वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस नेते सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांना इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पण, आता निवडणुकीनंतर पित्रोदा पुन्हा आपल्या पदावर परतले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी एक प्रेस नोट जारी करुन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, 'काँग्रेस अध्यक्षांनी सॅम पित्रोदा यांची इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी तत्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे.'
Sam Pitroda re-appointed as chairman of the Indian Overseas Congress with immediate effect pic.twitter.com/JZNb5P3PCD
— ANI (@ANI) June 26, 2024
लोकसभा निवडणुकीदरम्यान सॅम पित्रोदा यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. देशाच्या पूर्वेकडे राहणारे लोक चिनी लोकांसारखे दिसतात, पश्चिमेकडे राहणारे अरबांसारखे दिसतात, उत्तरेकडे राहणारे इंग्रजांप्रमाणे आणि दक्षिणित राहणारे आफ्रिकन लोकांसारखे दिसतात.' या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्यावर वर्णद्वेषी असल्याची टीका केली होती. यामुळे काँग्रेसला बॅकफुटवर यावे लागले होते. वाद वाढल्यानंतर सॅम पित्रोदा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने पुन्हा एकदा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदी सॅम पित्रोदा यांची नियुक्ती केली आहे.
विशेष म्हणजे, निवडणुकीदरम्यानच सॅम पित्रोदा यांनी वारसा हक्काबाबत केलेल्या टिप्पणीमुळेही बराच वाद झाला होता. अमेरिकेतील हक्कावर भाष्य करताना ते म्हणाले होते की, अमेरिकेत वारसा कर असतो. जर कुणाकडे 100 मिलियन डॉलर संपत्ती असेल, तर त्यातील 55 टक्के सरकार घेते आणि 45 टक्के मृतांच्या वारसांना मिळते. हा कायदा खूप चांगला आहे. तुमची अर्धी संपत्ती जनतेसाठी सोडावी, असा उद्देश आहे, असे पित्रोदा म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर देशातील जनतेची संपत्ती हिरावून घेण्याचा आरोप केला होता.
भाजपची काँग्रेसवर टीका
दरम्यान, पित्रोदा यांच्या नियुक्तीवर भाजप नेते अमित मालवीय यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, 'मध्यमवर्गीयांना त्रास देणारा परत आला. काँग्रेसने भारताचा विश्वासघात केला. निवडणुकीनंतर लगेच सॅम पित्रोदा यांना परत आणले.'