काँग्रेस नेते देणार राहुल गांधींना साथ, १३ जूनला ईडीसमोर हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 09:27 AM2022-06-09T09:27:01+5:302022-06-09T09:27:43+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांना ५ जून रोजी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर व्हायचे होते.
- आदेश रावल
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी १३ जून रोजी ईडीसमोर हजर होणार आहेत. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्याकडून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना, सरचिटणीस, प्रभारी आणि लोकसभा, राज्यसभा संसद सदस्य यांना दिल्लीतच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे सर्व नेते ईडीच्या कार्यालयाकडे जाणार आहेत.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल यांना ५ जून रोजी नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात ईडीसमोर हजर व्हायचे होते. राज्यसभा सदस्य अभिषेक मनू सिंघवी यांनी ईडीला पत्र लिहून सांगितले होते की, राहुल गांधी हे विदेशात आहेत. त्यामुळे त्यांना काही दिवसांची सवलत दिली जावी. त्यानंतर ईडीने १३ जून रोजी हजर होण्यास सांगितले होते. याच दरम्यान सोनिया गांधी यांना कोरोना झाला. त्यामुळे त्या ८ जून रोजी ईडीसमोर हजर झाल्या नाहीत.
यापूर्वी ईडीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्धही प्रकरण दाखल केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयापर्यंत पदयात्रा काढून आपली बाजू मांडणार असल्याचे जाहीर केले होते. अर्थात ईडीने शरद पवार यांना कोणतीही नोटीस जारी केली नव्हती. हे प्रकरण सप्टेंबर २०१९ मधील ५ हजार कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्याचे आहे. शरद पवार यांच्या घोषणेमुळे ईडीवर दबाव आला आणि एजन्सीने मेल पाठवून शरद पवार यांना सध्या चौकशीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांनी ईडीच्या कार्यालयात न येण्यास सांगितले.
- प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान अशीच घटना कोलकात्यात घडली होती. तृणमूलच्या दोन मंत्र्यांना सीबीआयने अटक केली होती. १८ मार्च २०२१ रोजी प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दोन मंत्र्यांच्या अटकेनंतर सीबीआयच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले होते.
- अर्थात, न्यायालयाने ममता बॅनर्जी यांना फटकारले होते. पण, सीबीआय त्यांच्या आक्रमकतेच्या दबावात आली आणि आतापर्यंत त्या मंत्र्यांच्या प्रकरणात कोणतीही प्रगती झालेली नाही.