राहुल गांधी यांनी अध्यक्ष राहावे यासाठी काँग्रेस नेत्यांनी तयार केला फॉर्म्युला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:35 AM2019-05-29T06:35:16+5:302019-05-29T06:35:43+5:30
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला.
- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : महाराष्ट्र, हरयाणासह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहावे, तोपर्यंत नव्या अध्यक्षाचा शोध घेण्यात येईल, असा फॉर्म्युला काँग्रेसच्या नेत्यांनी मंगळवारी तयार केला. त्यामुळे किमान चार महिने तरी राहुल गांधी पक्षाध्यक्षपदी राहतील, असे नेत्यांना वाटत आहे.
या तीन ते चार महिन्यांच्या काळात राहुल गांधी यांनी त्यांना स्वत:ला हवे आहेत, ते बदल पक्ष संघटनेत करावेत, त्यास कोणीही आक्षेप घ्यायचा नाही वा विरोध करायचा नाही, असेही काँग्रेस नेत्यांनी ठरविले आहे. म्हणजे राहुल गांधी यांना नाममात्र नव्हे, तर खऱ्या अर्थाने सर्वाधिकार देण्यास काँग्रेसचे नेते तयार झाले आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याही या फॉर्म्युल्याशी सहमत आहेत. मात्र राहुल गांधी यांनी तो स्वीकारला वा नाही, हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.
काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आज दिवसभरात राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांच्या राज्यात झालेल्या पराभवाबाबत चर्चा केली. त्यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, उपमुख्यमंत्री सचिन पायलट, प्रमोद तिवारी, शीला दीक्षित आदींचा समावेश होता. काल दिवसभर नेत्यांना भेटण्यास टाळणाºया राहुल गांधी यांनी आज भेट दिल्याने ते आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करतील, असे नेत्यांना वाटत आहे. काँग्रेसचे राज्यसभेतील नेते गुलाम नबी आझाद यांना बंगळुरूला जाऊ न काँग्रेस आमदारांना भेटण्याच्या सूचनाही राहुल यांनी आज दिल्या. त्यानुसार ते रवानाही झाले. कर्नाटकातील काँग्रेस आमदारांमध्ये दिसणारी सुंदोपसुंदी, त्याचा फायदा घेत आमदारांना फोडण्याचा भाजपने चालविलेला प्रयत्न आणि त्यामुळे तेथील आघाडीचे सरकार पडण्याची चर्चा या पार्श्वभूमीवर तेथील वातावरण शांत करण्याची जबाबदारी आझाद यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
राहुल गांधी यांना सर्वाधिकार दिल्यानंतर ते त्यांना आवश्यक वाटणाºया नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीवर घेऊ शकतील आणि प्रसंगी जुन्या, ज्येष्ठ व वृद्ध नेत्यांना दूरही करू शकतील, असे एका नेत्याने सांगितले. त्यामुळे राहुल यांनी त्यांच्या मनाप्रमाणे काम करता येईल, जुन्या नेत्यांचा दबाव येणार नाही, चेहºयाला तरुण चेहरा मिळू शकेल, असे हा नेता म्हणाला.
त्यासाठी ते वाटल्यास राजस्थान व मध्य प्रदेशातील नेतृत्वातही बदल करू शकतील, असे बोलले जाते. मात्र जुन्यांना न दुखावता हे करणे हे त्यांच्यापुढील मोठे आव्हानच असेल. त्यातच राजस्थानच्या काही मंत्री व आमदारांनी अशोक गेहलोत यांच्याविषयी तक्रारी केल्याने त्यांना कदाचित दूर केले जाईल आणि सचिन पायलट यांच्याकडे सत्तासूत्रे सोपवण्यात येतील, अशीही चर्चा आहे.
काँग्रेसने एक स्वतंत्र समिनी नियुक्त करून विविध राज्यांत झालेल्या पराभवाचा अभ्यास करेल आणि तो राहुल गांधी वा कार्यकारिणीला सादर करेल,
असाही फॉर्म्युल्याचा एक भाग
आहे.
ज्या राज्यात काँग्रेस सत्तेत असूनही पराभव झाला, तिथे कोणत्या नेत्याने, मंत्र्याने दगाफटका केला, कोणी उमेदवारांसाठी काम करण्याचे टाळले, कोणी विरोधकांना मदत केली, यासंबंधीचा सविस्तर अहवाल या समितीने करावा, असा मानस आहे. राहुल गांधी वायनाडच्या मतदारांचे आभार मानण्यासाठी केरळला जाणार आहेत. ते आल्यानंतर समितीत कोण असावे, याचा निर्णय होईल, असे समजते.
>मित्रपक्षांचाही आग्रह
राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी लालुप्रसाद यादव, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यासह अनेक मित्रपक्षांच्या नेत्यांनीही केली आहे.
राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचे कारण नाही, त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे, असे अभिनेते रजनीकांत यांनी म्हटले आहे, तर राहुल गांधी यांनी निवडणूक काळात घेतलेल्या परिश्रमांचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कौतुक केले आहे.
काँग्रेसचे नेते शशी थरूर, वीरप्पा मोईली, शीला दीक्षित यांनीही राहुल यांनी पक्षाध्यक्षपद अजिबात सोडू नये, असे म्हटले आहे.