१४ राज्यांतील नेत्यांची दिल्लीत बैठक; राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेची तयारी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2023 05:27 AM2023-12-30T05:27:59+5:302023-12-30T05:28:29+5:30
राहुल गांधी या यात्रेत दररोज काही किलोमीटर चालणार आहेत व उर्वरित यात्रा बसद्वारे केली जाणार आहे.
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :काँग्रेसने पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत न्याय यात्रेची तयारी सुरू केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ४ जानेवारी रोजी दिल्लीत १४ राज्यांचे सरचिटणीस प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्षाचे नेते आणि राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांची बैठक दिल्लीत बोलावली आहे.
भारत न्याय यात्रा या १४ राज्यांमधून जाणार आहे. या बैठकीत भारत न्याय यात्रेच्या मार्गाबाबत तपशीलाने चर्चा करण्यात येणार असून, त्याला अंतिम रूप दिले जाणार आहे. चार जानेवारी रोजीच यात्रेचे प्रतीक चिन्हही निश्चित केले जाणार आहे. त्यानंतर ८ जानेवारी रोजी भारत न्याय यात्रेच्या मार्गाची घोषणा केली जाणार आहे व यात्रा सुरू होण्यापूर्वी १२ जानेवारी रोजी यात्रेचे थीम साँग प्रकाशित केले जाणार आहे. राहुल गांधी या यात्रेत दररोज काही किलोमीटर चालणार आहेत व उर्वरित यात्रा बसद्वारे केली जाणार आहे.
‘हिंदुत्व विरुद्ध लोककल्याणकारी तत्त्वे संघर्ष’
पंतप्रधान मोदी यांना हिंदुहृदयसम्राट असल्याचे घोषित करून भाजप २०२४च्या लोकसभा निवडणुका हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढविण्याच्या तयारीत असल्याचे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे. हिंदुत्व विरुद्ध लोककल्याणकारी तत्त्वे असा संघर्ष पाहायला मिळेल, असे ते म्हणाले.