राहुल गांधींच्या नाराजीनंतर काँग्रेस नेत्यांना आली जाग; 120 नेत्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 09:41 PM2019-06-28T21:41:50+5:302019-06-28T21:42:43+5:30
गुरुवारी विवेक तन्खा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा देण्यावर ठाम राहिलेल्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माझ्याशिवाय कोणत्याच नेत्याने पराभवाची जबाबदारी स्वीकारली नसल्याची खंत व्यक्त केली होती. मात्र, यानंतर डोळे उघडलेल्या देशभरातील तब्बल 120 पदाधिकारी आणि नेत्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
राहुल गांधी यांनी एक बैठकीमध्ये, मी काँग्रेसच्या पराभवाची जबाबादारी घेत अध्यक्षपदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर देखील अनेक वरिष्ठ नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना परभवाची जबाबदारी घ्यावीशी वाटली नाही, याची खंत आहे, असे म्हटले होते. यानंतर 120 नेत्यांनी राजीनामे दिले असून यामध्ये युवक काँग्रेस, महिला काँग्रेस आणि सचिव यांच्यासह विविध राज्यांचे प्रदेशाध्यक्षांचा समावेश आहे. या नेत्यांनी राहुल गांधींकडे राजीनामा पाठविला आहे.
गुरुवारी विवेक तन्खा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले. मोठ्या नेत्यांमध्ये दिल्लीचे कार्यकारी अध्यक्ष राजेश लिलोठिया यांचाही समावेश आहे. याशिवाय हरियाणाच्या महिला प्रदेश काँग्रेस अध्यक्षा सुमित्रा चौहान, तेलंगाना काँग्रेसच्या उपाध्यक्षा पूनम प्रभाकर, गोव्यातील प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी राजीनामे पाठविले आहेत.
राहुल यांची मोठी नाराजी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविषयी आहे. याआधी २५ मे रोजी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी या दोन मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली होती. तर कमलनाथ यांनी आपल्या मुलासाठी सर्वाधिक सभा घेतल्याचे वृत्त देखील आले होते.
एका सुत्राने दिलेल्या महितीनुसार, पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर देखील काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांना, महासचिवांना आणि प्रभारींना पराभवाच्या जबाबदारीची जाणीव झाली नाही, याची खंत राहुल गांधी यांना आहे.