वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 06:17 PM2021-04-29T18:17:48+5:302021-04-29T18:18:31+5:30
कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. (Rahul gandhi)
नवी दिल्ली - कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. यातच राहुल गांधींनी आता पुन्हा एकदा सरकार आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी कवितेच्या ओळी शेअर करत म्हटले आहे :
"जो भरा नहीं है भावों से,
जो दर्द सुनने को तैयार नहीं,
वह हृदय नहीं है पत्थर है,
जिस ‘सिस्टम’ को जन से प्यार नहीं!"
Corona Vaccine: ही लक्षणं सांगतात, तुमच्या शरीरात काम करतेय कोरोना लस! पण, लक्षणं नसतील तर...?
तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी एक दिवस आधीच सरकारवर हल्ला चढवताना या सरकारला आंधळी सिस्टिम असे म्हटले होते. राहुल गांधींनी ट्विट करत लिहिले होते, "एक-मेकांची मदत करताना सामान्य लोक दिसतात, कुणाच्या हृदयाला स्पर्श करण्यासाठी हाताला स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. मदतीचा हात देत चला. या आंधळ्या ‘सिस्टिम’चे वास्तव दाखवत चला." राहुल गांधींनी यापूर्वी सेंट्रल विस्ता प्रोजेक्टसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले होते. (Congress leaer Rahul gandhi attacked without naming pm modi said he is not a heart it is a stone)
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे रुग्ण -
देशात गेल्या 24 तासांत 3,79,257 नवे कोरोना बाधित समोर आले आहेत. तर 2,69,507 बरे झाले आहेत. काल देशात 3,60,960 कोरोनाबाधित सापडले होते. आज यात जवळपास 18 हजारांनी वाढ झाली आहे. तर मृतांच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाने 3645 जणांचा बळी घेतला आहे. काल मृतांचा आकडा 3293 एवढा होता. यामध्ये आज जवळपास 350 मृतांची वाढ झाली आहे. आता, देशात एकूण मृतांचा आकडा 2,04,832 झाला असून सध्या 30,84,814 रुग्ण उपचार घेत आहेत. आजवर एकूण 1,83,76,524 रुग्ण सापडले असून यापैकी 1,50,86,878 रुग्ण बरे झाले आहेत. लसीकरणाचा आकडा 15,00,20,648 वर गेला आहे.
चार धाम यात्रा स्थगित -
देशातील कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर चार धाम यात्राही स्थगित करण्यात आली आहे. ही यात्रा 14 मेरोजी सुरू होणार होती. यात्रा स्थगित करण्यासंदर्भात उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी माहिती दिली. यात्रा रद्द करण्यासंदर्भात रावत म्हणाले, राज्यात कोरोना बाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. यामुळे यात्रा स्थगित करण्यात येत आहे. केवळ पुजाऱ्यांनाच तेथे पुजा करण्याची परवानगी असेल. संपूर्ण देशातील लोकांसाठी चार धाम यात्रा सध्यासाठी रद्द करण्यात येत आहे.