काँग्रेसचं नेतृत्व करण्यासाठी हंगामी अध्यक्षाची निवड करणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 10:41 AM2019-06-11T10:41:36+5:302019-06-11T10:42:27+5:30
काँग्रेसच्या सध्या स्थितीचा विचार केला तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाचा हंगामी अध्यक्ष बनविला जाऊ शकतो
नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर अद्यापही सस्पेन्स कायम आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल गांधी जर काँग्रेस अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम राहिले. त्यांनी निर्णय बदलला नाही तर अशावेळी पक्षाकडून दुसऱ्या पर्यायाचा विचार करण्यात येत आहे. गांधी कुटुंबीयाकडे अध्यक्षपद नको या परिस्थितीत पक्षाकडून हंगामी अध्यक्ष बनविण्याचा विचार सुरु करण्यात आला आहे.
काँग्रेसच्या सध्या स्थितीचा विचार केला तर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याला पक्षाचा हंगामी अध्यक्ष बनविला जाऊ शकतो. या हंगामी अध्यक्षाला निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी एक विशिष्ट समिती असेल ज्यात काँग्रेसच्या मोठ्या चेहऱ्याचा समावेश असेल. याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के एंटनी आज राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 52 जागांवर विजय मिळविता आला आहे. लोकसभेच्या स्थितीवरही भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पक्षाच्या स्तरावर आत्तापर्यंत कोणताही मोठा निर्णय घेतला गेला नाही. राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ नये यासाठी काँग्रेसमधील दिग्गज मंडळी प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. जर राहुल गांधी अध्यक्षपदावर कायम राहण्यास तयार झाले तर पक्षात मोठे बदल होणार नाहीत. लोकसभेत काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधी यांनी करावे यासाठीही पक्षाचे नेते आग्रह धरत आहेत. पुढील आठवड्यात लोकसभेतील काँग्रेस नेत्याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल.
संसदेचे अधिवेशन येत्या 17 जूनपासून सुरु होणार आहे. त्याआधी राहुल गांधी यांना लोकसभेच्या नेतेपदावर नियुक्त करण्याची नेत्यांच्या हालचाली सुरु आहेत. मागील लोकसभेत मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेते होते मात्र यंदाच्या निवडणुकीत खरगे यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे पक्षाला नवीन लोकसभा नेता निवडणे गरजेचे आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार मागील 15 दिवसांपासून काँग्रेसचे अनेक नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना भेट झाली नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमके आगामी काळात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळणार हे नक्की