'आपापसातले मतभेद विसरुन काम करा', मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यकर्ते-पदाधिकाऱ्यांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:22 PM2024-01-04T16:22:27+5:302024-01-04T16:23:14+5:30
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षातील नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
Congress Meeting:लोकसभा निवडणुकीची देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस विधीमंडळ पक्ष (CLP) नेत्यांसह देशभरातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी आणि आगामी भारत न्याय यात्रेबाबत चर्चा करणे, हा या बैठकीचा अजेंडा होता. यादरम्यान खरगेंनी भाजपवर जोरदार टीका केली.
पक्षश्रेष्ठींच्या बैठकीला संबोधित करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी पुढील तीन महिने पक्षासाठी झोकून द्या. आपापसातले मतभेद विसरा, मीडियामध्ये पक्षांतर्गत मुद्दे उपस्थित करू नका. पक्षाच्या विजयासाठी सर्वांनी सोबत काम करता. एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांवर विशेष लक्ष द्या," अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
LIVE: Congress party briefing by Shri @Jairam_Ramesh after the meeting of General Secretaries, In-Charges, PCC Presidents and CLP leaders at the AICC HQ in New Delhi. https://t.co/ZRhuK4d6y3
— Congress (@INCIndia) January 4, 2024
भाजपवर टीकास्र
"गेल्या 10 वर्षातील आपल्या सरकारचे अपयश लपवण्यासाठी भाजप भावनिक मुद्दे पुढे करत आहे. प्रत्येक मुद्द्यावर ते काँग्रेसला गोवतात. जनतेसमोर तळागाळातील प्रश्नांवर भाजपच्या खोटेपणा, फसवेगिरी आणि चुकीच्या कृत्यांना आपण संघटित होऊन चोख प्रत्युत्तर द्यायचे आहे." खरगे यांनी यावेळी दावा केला की, "ज्या राज्यांमध्ये इंडिया आघाडीतील पक्ष आहे, तिथे भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) केवळ नावापुरतीच राहिली आहे."
खरगे पुढे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मणिपूरमधील अनुपस्थिती, हे राष्ट्रीय प्रश्नांवर किती बेजबाबदार आहेत हे दिसून येते. आधुनिक भारताच्या उभारणीत काँग्रेसच्या योगदानाकडे मोदी सरकार दुर्लक्ष करतात. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. पीएसयू आणि मोठ्या संस्था विकल्या जाताहेत, रेल्वे विकली जातीय, प्रत्येक संस्थेचा गैरवापर होत आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.