न्यायाधीशांच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल गांधींच्या घरी काँग्रेसची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 04:59 PM2018-01-12T16:59:58+5:302018-01-12T17:07:03+5:30
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन केलं आहे.
नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठकीचं आयोजन केलं आहे. संध्याकाळी 5 वाजता राहुल गांधी यांच्या घरी बैठक होणार आहे. तर दुसरीकडे डी. राजा हे सुप्रीम कोर्टचे न्यायमूर्ती चेमलेश्वर यांच्या घरी पोहोचले आहेत.
विशेष म्हणजे राहुल गांधींच्या निवासस्थानी होणा-या बैठकीत अनेक वकीलही सहभागी होणार आहेत. त्यानंतर 6 वाजता काँग्रेस न्यायमूर्तींच्या वादावर प्रतिक्रिया देणार आहे. परंतु या बैठकीपूर्वीच माजी कायदा मंत्री आणि वरिष्ठ वकील सलमान खुर्शीद यांनी न्यायाधीशांची पत्रकार परिषद ही खूप दुःखद घटना असल्याचं सांगितलं आहे.
देशातील सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना प्रसारमाध्यमांसमोर येऊन स्वतःची बाजू मांडावी लागत आहे, यासारखे दुर्दैव ते काय, अशी प्रतिक्रिया सलमान खुर्शीद यांनी दिली आहे. तर ज्येष्ठ वकील आणि भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, न्यायाधीशांनी गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. तसेच पत्रकार परिषद घेणारे ते चार न्यायाधीश प्रामाणिक आहेत. त्यांच्या उद्देशावर शंका उपस्थित केली जाऊ शकत नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही सुब्रमण्यम स्वामींनी केली आहे.
न्यायव्यवस्थेत केंद्र सरकारचा हस्तक्षेप घातक- ममता
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या वादावर भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. सर्वोच्च न्यायालयाती चार न्यायाधीशांकडून मिळालेल्या माहितीमुळे देशातील एक नागरिक म्हणून मी अस्वस्थ झाले आहे. न्यायव्यवस्था आणि मीडिया हे लोकशाहीचे आधारस्तंभ आहेत. न्यायव्यवस्थेत केंद्र सरकारचा हस्तक्षेप घातक आहे, असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. परंतु केंद्र सरकारकडून अद्यापही या प्रकारावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. ममता बॅनर्जी आणि वकिलांना सोडल्यास काँग्रेस किंवा भाजपाकडून अद्यापही अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.