काँग्रेस सदस्य आरोग्यमंत्र्यांना भिडले; राहुल गांधी यांचा निषेध करताच विरोधक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 04:12 AM2020-02-08T04:12:45+5:302020-02-08T06:28:32+5:30
सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत टीका केल्याचा आरोप करून, त्या वक्तव्यांचा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत निषेध केला. त्यावेळी सत्ताधारी व विरोधी पक्ष सदस्यांमध्ये खडाजंगी उडाली. त्यामुळे कामकाज तहकूब करण्यात आले.
काँगेस सदस्यांनी सभागृहात माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप हर्षवर्धन यांनी नंतर केला. ते म्हणाले की, काँग्रेसचे सदस्य माझ्यापर्यंत चाल करून आले. त्यांनी माझी कागदपत्रे हिसकावली. मोदींवर राहुल गांधी यांनी अश्लाघ्य भाषेत टीका केली होती. माजी पंतप्रधानाच्या पुत्राने अशी भाषा वापरणे अपेक्षित नव्हते. या प्रकरणी राहुल गांधी यांनी माफी मागावी.
राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन उभे राहिले. आपण राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींविषयी काढलेल्या उद्गारांचा समाचार घेऊन, मग प्रश्नाला उत्तर देऊ, असे ते म्हणताच, काँँग्रेसच्या सदस्यांनी त्यास आक्षेप घेतला. प्रश्नाचेच उत्तर द्या, असा आदेश लोकसभाध्यक्षांनीही हर्षवर्धन यांना दिला, तरीही आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांचा निषेध केला.
त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी हर्षवर्धन यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तेव्हा हर्षवर्धन यांच्या रोखाने चाल करून गेलेले काँग्रेसचे मनिकम टागोर यांना भाजपचे ब्रिजभूषण शरण सिंह यांनी अडविले.
काँग्रेसचे हिबी इदेन यांनीही आक्रमक पवित्रा धारण केला. या सर्वांना रोखण्यासाठी सत्ताधारी व विरोधी पक्षांचे सदस्य पुढे सरसावले. त्यावेळी मंत्री स्मृती इराणी यांनी हे तुम्ही काय करत आहात, असा सवाल संतप्त सदस्यांना विचारला. या गदारोळातही हर्षवर्धन यांनी राहुल गांधी यांचा निषेध करणारे भाषण सुरूच ठेवले.
सहा महिन्यांनी देशातील युवक पंतप्रधानांना काठ्यांनी चोप देऊन देशाबाहेर हाकलतील, असे अत्यंत अश्लाघ्य उद्गार राहुल यांनी काढल्याचे हर्षवर्धन म्हणाले. त्यावर इतकी खडाजंगी झाली की, अध्यक्षांनी कामकाजाआधी एक तास व नंतर दिवसभरासाठी सभागृह तहकूब केले.
बाबुल सुप्रियोंना खडसावले
केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या उद्गारांचा काँग्रेस सदस्यांनी सुप्रियो यांचा निषेध केला. सभागृहातील कोणत्याही सदस्यावर वाट्टेल ती टीका करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही, अशा शब्दांत बाबुल सुप्रियो यांना बिर्ला यांनी खडसावले. हे उद्गार लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आले.
राहुल गांधी : मोदी पंतप्रधानांसारखे वागत नाहीत
नरेंद्र मोदी पंतप्रधानांसारखे वागत नाहीत, अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते म्हणाले की, पंतप्रधानांनी आपली आब राखायला हवी, पण मोदी तसे करीत नाहीत. मोदींच्या गुरुवारच्या लोकसभेतील भाषणाच्या वेळी राहुल गांधी यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल यांना उद्देशून मोदी म्हणाले की, काही जणांची ट्यूब उशिरा पेटते. मी ३०-४० मिनिटे बोलतो आहे, पण त्याचा करंट आता काही लोकांपर्यंत पोहोचला. या उद्गारांवर राहुल गांधी यांनी हे उद्गार काढले.