काँग्रेसच्या दोन आमदारांवर दारू पिऊन ट्रेनमध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा आरोप, एफआयआर दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2022 04:58 PM2022-10-07T16:58:52+5:302022-10-07T17:00:34+5:30
धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन आमदारांविरुद्ध विनयभंगाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
भोपाळ : मध्य प्रदेशातील सागरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. याठिकाणी काँग्रेसच्या दोन आमदारांवर धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, धावत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन आमदारांविरुद्ध विनयभंगाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेसच्या या दोन्ही आमदारांवर दारूच्या नशेत विनयभंग केल्याचा आरोप आहे.
यासंदर्भात सागर जीआरपी स्टेशन प्रभारी प्रमोद अहिरवार यांनी सांगितले की, रेवांचल एक्स्प्रेसमधील महिला प्रवासी रेवाहून भोपाळला जात होती. यादरम्यान, काही लोक महिला प्रवाशासोबत गैरवर्तन करत असल्याची माहिती सागर जीआरपी यांना मिळाली. यानंतर सागर जीआरपीची एक महिला अधिकारी आणि दोन पुरुष अधिकारी सागर येथून ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.
प्रमोद अहिरवार यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना सागरच्या आधी सांगितली जात आहे. ते म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी धावत्या ट्रेनमधील महिलेची तक्रार ऐकली आणि संपूर्ण घटनेची लेखी नोंद केली. तसेच, तक्रार कॉपीच्या आधारे आमदार सिद्धार्थ कुशवाह आणि सुनील सराफ यांच्या विरोधात विनयभंगाच्या कलमाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे प्रमोद अहिरवार यांनी सांगितले.
आमदारांवर दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोप
रेवांचल एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी सतना येथील काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाह, कोतमाचे आमदार सुनील सराफ यांच्यावर अनेक आरोप झाले आहेत. या दोन्ही आमदारांवर दारूच्या नशेत असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण सागरचे आहे, सागर जीआरपी त्यावर कारवाई करत आहे, असे भोपाळ जीआरपी एसपी हितेश चौधरी यांनी सांगितले.
संपूर्ण प्रकरणावरून राजकारण सुरू
याप्रकरणी भोपाळ आणि हबीबगंज जीआरपी पोलिसांनी मदत केली. यासोबतच महिलेच्या पतीनेही ट्विट करून रेल्वेमंत्री आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली होती. आता या संपूर्ण प्रकरणावरून राजकारणही सुरू झाले आहे. मात्र, काँग्रेसच्या दोन्ही आमदारांनी स्वत: निर्दोष असल्याचे म्हटले आहे.