VIDEO: हात लावाल, तर चामडी सोलू; काँग्रेस आमदाराची भाजपा कार्यकर्त्यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 10:52 AM2020-02-20T10:52:40+5:302020-02-20T10:54:04+5:30
जनसभेला संबोधित करताना काँग्रेस आमदाराचा भाजपाला इशारा
भोपाळ: मध्य प्रदेशमधले काँग्रेसआमदार विजय चौरे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये विजय चौरे भाजपा कार्यकर्त्यांना धमकी देताना दिसत आहे. चौरे यांचा व्हिडीओ छिंदवाडातल्या सौसरमधला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना हात लावण्याचा प्रयत्न केल्यास चामडी सोलून काढण्यासही मागे पुढे पाहणार नाही, अशी उघड उघड धमकी चौरे यांनी दिली आहे.
छिंडवाडातल्या सौसरमध्ये काल एका सभेला संबोधित करताना काँग्रेस आमदार विजय चौरे यांनी वादग्रस्त विधान केलं. राज्यातले भाजपा नेते परिस्थिती बिघडवण्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेस कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केलात, तर चामडी सोलून काढू, अशी थेट आणि स्पष्ट धमकी त्यांनी भाजपाला दिली.
#WATCH MP:Congress MLA Vijay Choure in Chhindwara's Sausar: ..BJP ke logon,jis din Congress ke kisi karyakarta par ungli uthane ka prayas kare,uske baal ko haath lagane ka prayas kare,iss manch se sarvjanik roop se kehta hoon,hum uski khaal nochne mein kasar nahi chhodenge.(19.2) pic.twitter.com/P6rXOE3enr
— ANI (@ANI) February 20, 2020
'राज्यातल्या काँग्रेस सरकारनं एक वर्ष पूर्ण केलं आहे. या एक वर्षाबद्दल बोलण्यासारखं त्यांच्याकडे (भाजपाकडे) काही नाही. आमदार, खासदाराविरोधात बोलण्यासारखा मुद्दा त्यांच्याकडे नाही. मुख्यमंत्री, सरकारविरोधात बोलण्यासारखं त्यांच्याकडे काही नाही. सरकारनं एक वर्षात केलेली कामं सर्वांसमोर आहेत. त्यामुळे आता सौहार्दपूर्ण वातावरण खराब करण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. शांततामय वातावरण बिघडवण्याचं काम भाजपाच्या लोकांनी ५-७ दिवसांत केलं. त्यांनी आमदार, खासदार, मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असा स्पष्ट आरोप त्यांनी केला.
'नुकतेच भाजपाचे नेते इकडे येऊन गेले. लांबलचक भाषण देऊन गेले. मूर्ती कोणी तोडली याचा शोध घेण्यासाठी तहसीलदाराचे कॉल रेकॉर्ड तपासा, असं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. मी त्यांचं स्वागत करतो. आम्ही सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत. आम्ही काँग्रेसची मंडळी आहोत. कोणत्याही अवैध, अनैतिक कामांमध्ये आमचा सहभाग नाही. अवैध कामं तुम्ही करता आणि बदनाम मात्र काँग्रेसच्या मंडळींना करता. आता आम्ही हे सहन करणार नाही, हे लक्षात ठेवा. आमच्या कार्यकर्त्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केलात, त्याच्या केसाला जरी धक्का लावण्याचा प्रयत्न केलात, तर सार्वजनिक सभेतून सांगतोय, त्याची चामडी सोलून काढण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही,' अशी धमकी त्यांनी दिली.