“बेरोजगारी अन् महागाई हेच संसद घुसखोरीचे मुख्य कारण”; राहुल गांधींची केंद्रावर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 02:21 PM2023-12-16T14:21:29+5:302023-12-16T14:23:37+5:30
Lok Sabha Security Breach Parliament Attack: पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे तरुणांना रोजगार मिळत नसल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
Lok Sabha Security Breach Parliament Attack: संसदेत घुसखोरी प्रकरणी विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. दोन दिवसांपासून संसदेतील गोंधळ कायम आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी १३ डिसेंबरच्या घटनेवर सभागृहात उत्तर द्यावे, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. मात्र, सरकारकडून सभागृहात कोणतेही निवेदन देण्यात आलेले नाही. गृहमंत्री शाह सभागृहात येऊन संपूर्ण घटनेवर निवेदन करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू शकणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. संसद घुसखोरी प्रकरणी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी थेट शब्दांत भाष्य केले.
असे का घडले? मुख्य मुद्दा बेरोजगारी आहे. बेरोजगारीचा मुद्दा संपूर्ण देशभरात आहे. पंतप्रधान मोदींच्या धोरणांमुळे देशातील तरुणांना रोजगार मिळत नाही. संसदेत घुसखोरी होण्याची घटना झाली, त्यामागे बेरोजगारी आणि महागाई हेच कारण आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे
हा गंभीर विषय आहे. सरकारने याकडे लक्ष द्यावे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन द्यावे, हीच मागणी संसदेत वारंवार केली जात आहे. मात्र, गृहमंत्र्यांना यायचे नाही आणि निवेदन द्यायचे नाही. ते (भाजप) सभागृहाचे कामकाज चालू द्यायला तयार नाहीत. ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट नाही पण ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही त्यांच्याशी बोलण्यात अर्थ नाही. ते (भाजप) काँग्रेसचे नाव घेऊन आणि नेहरू-गांधींना शिव्या देऊन मते मागतात. त्यांचे काम म्हणजे आम्हाच्यावर टीका करून मते मिळवणे हेच आहे, या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.
दरम्यान, संपूर्ण विरोधी गट ‘इंडिया’ची एकच मागणी आहे की, सुरक्षेत त्रुटी कशा राहिल्या, हे सरकारने सभागृहाला सांगावे. प्रत्यक्षात या घटनेपासून आतापर्यंत दिल्ली पोलिसांनीही मौन बाळगले आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. विरोधी सदस्यांनी सतत गदारोळ केल्यामुळे शुक्रवारी लोकसभा आणि राज्यसभेत एका मिनिटांत कामकाज ठप्प पडले. यामुळे गुन्हेगारी कायद्यांची जागा घेणारी तीन विधेयके रखडली.