काँग्रेस खासदार राहुल गांधी होणार विरोधी पक्षनेते; इंडिया आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:11 PM2024-06-25T22:11:24+5:302024-06-25T22:13:53+5:30
Congress MP Rahul Gandhi News: मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी याबाबतची माहिती दिली.
Congress MP Rahul Gandhi News: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अनेकविध मुद्द्यांवरून इंडिया आघाडीचे खासदार एनडीए सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. संसदेच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. यातच काँग्रेस खासदार राहुल गांधी विरोधी पक्षनेते होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीच्या एका बैठकीत यावर निर्णय झाल्याचे सांगितले जात आहे.
लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. एनडीएकडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाने सर्व खासदारांना व्हीप जारी करत निवडणुकीसाठी संसदेत हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून राहुल गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला.
इंडिया आघाडीच्या बैठकीत मोठा निर्णय
मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर माहिती देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याबाबत चर्चा झाली. यासंदर्भात हंगामी अध्यक्षांना एक पत्र देण्यात आले आहे. तत्पूर्वी, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांना लोकसभेतील विरोधी पक्षनेते बनवण्याची एकमुखी मागणी करण्यात आली होती. काँग्रेस कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल गांधी यांची लोकसभेतील पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा ठराव मंजूर केला होता.
दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर त्यांचा विजय झाला. मात्र, त्यानंतर राहुल गांधी यांनी रायबरेलीची जागा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आणि वायनाडची जागा सोडली. राहुल गांधी यांनी मंगळवारी संविधानाची प्रत हातात ठेवून लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.