"मोदी-अदानी एक आहेत"; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 13:12 IST2024-12-05T13:12:01+5:302024-12-05T13:12:57+5:30
Congress Rahul Gandhi And Priyank Gandhi : काँग्रेस खासदारांनी गुरुवारी संसदेत अदानी प्रकरणावरून अनोख्या शैलीत निदर्शनं केली. यावेळी त्यांच्या जॅकेटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं.

"मोदी-अदानी एक आहेत"; राहुल आणि प्रियंका गांधींच्या खास जॅकेटने वेधलं सर्वांचं लक्ष
काँग्रेस खासदारांनी गुरुवारी संसदेत अदानी प्रकरणावरून अनोख्या शैलीत निदर्शनं केली. यावेळी त्यांच्या जॅकेटने लोकांचं लक्ष वेधून घेतलं. "मोदी-अदानी एक आहेत" अशी घोषणा लिहिलेलं काळ्या रंगाचं जॅकेट त्यांनी परिधान केलं होतं. अदानी समूहावर लाचखोरीचा आरोप करण्यात आला आहे.
"मोदी-अदानी एक आहेत" अशी घोषणा लिहिलेलं काळ्या रंगाचं हाफ-जॅकेट परिधान करून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि खासदार प्रियंका गांधी यांच्यासह अनेक खासदारांनी गुरुवारी संसदेच्या संकुलात प्रतिकात्मक निदर्शनं केली. याचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून जॅकेटची सर्वत्र तुफान चर्चा रंगली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, "मोदीजी अदानींची चौकशी करू शकत नाहीत, कारण जर त्यांनी असं केलं तर ते स्वत:चीच चौकशी करतील... मोदी आणि अदानी एक आहेत. दोन नाहीत, तर ते एकच आहेत."
मोदी अडानी एक है और इस सच्चाई को मीडिया आपको कभी नहीं दिखाएगा। pic.twitter.com/Dum0IQb0qR
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 5, 2024
बुधवारी देखील इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी अदानी प्रकरणावरून संसदेच्या संकुलात निषेध केला आणि या प्रकरणाच्या संयुक्त संसदीय चौकशीची मागणी केली आहे. काँग्रेस, आप, आरजेडी, शिवसेना (यूबीटी), डीएमके आणि इतर खासदारांनी घोषणाबाजी केली. याच दरम्यान विरोधी खासदारांनी संसदेच्या गेटवर ‘मोदी-अदानी एक आहेत’ असे लिहिलेले बॅनर धरले होते.
लोकसभा सचिवालयाने मंगळवारी खासदारांना संसदेच्या गेटसमोर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं होतं. याच दरम्यान त्यांनी सांगितलं की, अशा गोष्टी करून अडथळा आणल्यास त्यांच्या सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. राहुल गांधी यांनी गेल्या महिन्यात अदानींवर टीकास्त्र सोडलं होतं. तर दुसरीकडे अदानी समूहाने सर्व आरोप निराधार असल्याचं सांगून फेटाळून लावले आहेत.