Sonia Gandhi : "मी इंदिरा गांधींची सून आहे, मी कोणालाही घाबरत नाही"; सोनिया गांधींचा 'तो' Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 03:42 PM2022-07-21T15:42:06+5:302022-07-21T15:53:09+5:30
Congress Sonia Gandhi Video : सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) चौकशीला सामोरं जात आहेत. एकीकडे सोनिया गांधी ईडीच्या चौकशीला सामोरं जात आहेत तर दुसरीकडे देशभर काँग्रेस कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार सोनिया गांधींचा जबाब मनी लॉन्ड्रींग कायद्याच्या सेक्शन ५० अंतर्गत नोंदवला जाणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी यांची पहिल्यांदाच ईडीकडून चौकशी होत आहे.
ईडीने याआधी राहुल गांधी यांची जवळपास वेगवेगळ्या दिवशी एकूण मिळून ५० तास चौकशी केली होती. यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सोनिया गांधींचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. "मी इंदिरा गांधींची सून आहे आणि कुणालाही घाबरत नाही" असं सोनिया गांधी या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत. नाना पटोले यांनी हा व्हिडीओ शेअर करताना #सत्यसाहससोनिया गांधी असा हॅशटॅग देखील वापरला आहे. हा व्हिडीओ नेमका कधीचा आहे. याबाबत माहिती मिळू शकलेली नसली. पण आता सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी होत असताना तो तुफान व्हायरल होत आहे.
मी इंदिरा गांधींची सून आहे आणि मी कोणालाही घाबरत नाही.
— Nana Patole (@NANA_PATOLE) July 21, 2022
- सोनिया गांधी#सत्य_साहस_सोनिया_गांधीpic.twitter.com/gmmkemRfNz
"आज देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल"
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जातोय, अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा विजय होईल" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "जीएसटीवर चर्चा करा - सभागृह तहकूब, महागाईवर चर्चा - सभागृह तहकूब, अग्निपथवर चर्चा करा - सभागृह तहकूब, एजन्सींच्या गैरवापरावर चर्चा - सभागृह तहकूब. आज जाहीरपणे देशातील जनतेचा आवाज दाबला जात आहे. या अहंकार आणि हुकूमशाहीवर 'सत्या'चा विजय होईल" असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी बोलावलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र या कारवाईचा निषेध करत काँग्रेसचे कार्यकर्ते देशभर रस्त्यावर उतरले आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले असून त्याचा फटका वाहतूकीला बसला आहे. दिल्लीत पोलिसांकडून सकाळी ९ वाजल्यापासून गोल मेथी जंक्शन, तुगलक रोड जंक्शन, सुनहरी मस्जिद जंक्शन, मान सिंह रोड जंक्शन याठिकाणी प्रचंड बंदोबस्त तैनात केला आहे.