राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 06:29 AM2024-05-15T06:29:30+5:302024-05-15T06:31:42+5:30
तरुणांवर भर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामचा करून घेतला पुरेपूर वापर; निवडणुकीदरम्यान वापरला नवा फंडा
आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली :काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारासाठी ५० सेकंद ते १.२५ मिनिटांच्या रील्सचा पुरेपूर उपयोग केला आहे. बदलत्या काळात रील्सची क्रेझ कुणापासूनही लपून राहिलेली नाही.
काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी. चिदंबरम आणि त्यांच्या टीमने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून जाहीरनामा जारी केला. काँग्रेसची ध्येयधोरणे लोकांमध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांभाळली.
सोशल मीडियासोबत केले काम
सोशल मीडिया टीमसोबत प्रियांका गांधी यांनी ५ न्याय आणि २५ गॅरंटीसह रील्स तयार केल्या. या रील्स आता प्रसिद्ध केल्या जात आहेत. प्रियांका गांधी यांनीच 'हाथ बदलेगा हालात' या मोहिमेच्या संकल्पनेला हिरवा कंदील दाखविला होता. राहुल गांधी मोठ्या प्रमाणावर प्रचार, इंडिया आघाडी या बाजू सांभाळत आहेत. राहुल गांधी भाजपवर टीका करून स्वतः रील्स पोस्ट करत आहेत. ज्यांना सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.