काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 07:03 IST2025-01-16T05:43:59+5:302025-01-16T07:03:14+5:30
नवीन मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे.

काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन
नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांच्या हस्ते बुधवारी ‘९ए कोटला मार्ग' येथील सुसज्ज व अत्याधुनिक अशा ‘इंदिरा भवन' या काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. पूर्वी '२४, अकबर रोड'वर काँग्रेसचे मुख्यालय होते. तब्बल ४७ वर्षांनंतर काँग्रेस मुख्यालयाचा पत्ता बदलला आहे.
नवीन मुख्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण ठरला आहे. मुख्यालयाच्या उद्घाटनावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी, के.सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते.
अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या नवीन अत्याधुनिक केंद्रीय मुख्यालयाला इंदिरा गांधी भवन असे नाव देण्यात आले असून, ते काँग्रेस पक्षाच्या दिग्गज नेत्यांचा दृष्टिकोन कायम ठेवण्यासाठी सतत केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचे प्रतीक असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काळानुसार पुढे जाण्याची व नवीन गोष्टी आत्मसात करण्याची वेळ आली असल्याचे उद्घाटनप्रसंगी एआयसीसीचे संघटन सचिव वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. सोनिया काँग्रेसच्या अध्यक्ष असतानाच्या काळात या भवनाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती.
नवीन मुख्यालयाची वैशिष्ट्ये
या सहा मजली मुख्यालयाच्या सर्वात वरच्या मजल्यावर काँग्रेस अध्यक्षांचे कार्यालय असेल.
मोठ्या बैठकांसाठी मिटिंग हॉल, पत्रकार परिषदेचे विशेष केंद्र, लाईव्ह प्रसारणाची सुविधा.
अभ्यास व संशोधनासाठी भव्य ग्रंथालय, हायस्पीड इंटरनेट सेवा व व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा.
इमारतीत युवा, महिला काँग्रेस, एनएसयूआयसह काँग्रेसच्या विविध संघटनांची कार्यालये असतील.
मुख्यालयाच्या विविध भागात काँग्रेसच्या इतिहासाची माहिती देणारी भित्तीपत्रक, तसेच काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची छायाचित्रे असतील.
२००९ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हस्ते या मुख्यालयाची पायाभरणी झाली होती. याच्या उभारणीसाठी २५२ कोटी रुपये खर्च आला आहे.
- ४७ वर्षांनी नव्या इमारतीतून चालणार काम