मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा आक्रमक पवित्रा; रामलीला मैदानावर आज 'भारत बचाव रॅली'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2019 09:11 AM2019-12-14T09:11:38+5:302019-12-14T09:21:30+5:30
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला.
नवी दिल्ली - दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात भव्य रॅली काढण्यात येणार आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक मंदी आणि अन्य मुद्द्यावरुन काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहे. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. या रॅलीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी होणार आहेत.
रामलीला मैदानात काँग्रेसच्या या रॅलीसाठी भव्य पोस्टर्स लावण्यात आले आहेत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे सगळेच नेते या भव्य रॅलीला उपस्थित राहणार आहेत.
Delhi: Preparations underway at Ramlila Maidan where Congress is organising 'Bharat Bachao' rally today. pic.twitter.com/nRvz8RHcJV
— ANI (@ANI) December 14, 2019
तसेच देशाच्या प्रत्येक राज्यातून काँग्रेस कार्यकर्ते या रॅलीत सहभाग घेणार आहेत. यामध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी कार्यकर्त्यांना संबोधित करतील. नागरिकत्व सुधारणा विधेयकाविरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत महिलांवरील अत्याचार असे अनेक मुद्दे घेऊन काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आक्रमक होण्याचा पवित्रा घेतला आहे.
राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस गाजला. त्यांनी माफी मागावी अशी मागणी भाजप खासदारांनी लोकसभेत लावून धरली असताना दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आम्हाला न्याय हवा अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी सभागृहात उपस्थित होते. राहुल गांधी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येईल असे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले. तरीही सत्ताधारी व विरोधी बाकांवरून सुरू असलेला गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकुब केले.
मोदी यांनीच माफी मागावी : राहुल गांधी
रेप इन इंडिया वक्तव्याबद्दल मी कधीही माफी मागणार नाही, असे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. यूपीए सरकारच्या कारकीर्दीत दिल्ली ही बलात्काराची राजधानी बनली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केले होते. त्याचा जुना व्हिडिओ मोदी यांनी पुन्हा पाहावा असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्य भारताला आगीच्या खाईत लोटले आहे. हाच सध्याचा ज्वलंत प्रश्न असून त्यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी माझ्या वक्तव्याचे भांडवल केले जात आहे. ईशान्य भारताला संकटात टाकल्याबद्दल, भारताची अर्थव्यवस्था उद्धवस्त केल्याबद्दल मोदी यांनी माफी मागितली पाहिजे.