"वायनाडमधून लढायला या, मोदीजींना कोण रोखतंय?"; काँग्रेसचं पंतप्रधानांना ओपन चॅलेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 01:07 PM2024-06-18T13:07:46+5:302024-06-18T13:10:43+5:30
Priyanka Gandhi And Narendra Modi : काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वायनाडमधून निवडणूक लढवण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे. मोदीजींनीही वायनाडमधून निवडणूक लढायला यावं, त्यांना कोण रोखत आहे? असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा दिला आहे. ते रायबरेलीतून खासदार असतील. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना वायनाडमधून पोटनिवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रियंका उमेदवार होताच काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वायनाडमधून निवडणूक लढवण्याचं ओपन चॅलेंज दिलं आहे. मोदीजींनीही वायनाडमधून निवडणूक लढायला यावं, त्यांना कोण रोखत आहे? असं काँग्रेस नेते पवन खेडा यांनी म्हटलं आहे.
वायनाड सोडून रायबरेलीचे खासदार राहण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयाचा संदर्भ देत पवन खेडा म्हणाले की, "हा निर्णय आम्हा सर्वांना आवडला. संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली आहे. भाजपाचा कोणताही नेता तेथे निवडणूक लढवण्यासाठी येऊ शकतो. वायनाडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही निवडणूक लढवण्यासाठी येऊ शकतात, त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोण रोखत आहे?"
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी काँग्रेसच्या बैठकीनंतर जाहीर केलं होतं की, राहुल गांधी रायबरेलीचे खासदार राहतील, ते वायनाडची जागा सोडतील. काँग्रेस वायनाडमधून प्रियंका गांधी यांना उमेदवारी देणार आहे. या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी वायनाड मतदारसंघातून आपला राजीनामा लोकसभेकडे पाठवला आहे. दुसरीकडे प्रियंका गांधी यांनीही पक्षाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
२०१९ प्रमाणे यावेळीही राहुल गांधींनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. राहुल गांधींनी वायनाड आणि रायबरेली या दोन्ही जागा जिंकल्या. २०१९ मध्ये, त्यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली, ते वायनाडमध्ये विजयी झाले, तर अमेठीमध्ये ते स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले. यावेळी काँग्रेसने अमेठीतून राहुल यांच्या जागी केएल शर्मा यांना तिकीट दिलं होतं. केएल शर्मा यांनी यावेळी स्मृती इराणी यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला आहे.