कर्नाटकसाठी काँग्रेसचा प्लॅन-बी; खरगे, राहुल आणि प्रियांका गांधी प्रचारात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 07:33 AM2023-04-25T07:33:54+5:302023-04-25T07:34:16+5:30
निवडणुका होईपर्यंत हलायचे नाही
आदेश रावल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६० जागा केवळ २००० मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या ६० जागांवर काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यातून निरीक्षकांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी सर्व निरीक्षकांची बैठक घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत खरगे यांनी प्रत्येक नेत्याची स्वत: भेट घेतली. ते म्हणाले, आपण एकूण ६० जण आहात. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण २००० मतांच्या फरकाने ६० जागा गमावल्या होत्या. त्यामुळे आता प्रत्येकाला एका जागेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. नेत्यांनी केवळ भाषण द्यायचे नाही किंवा व्यासपीठावर बसायचे नाही. काँग्रेस उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला येथे बोलाविले आहे.
निवडणुका होईपर्यंत हलायचे नाही
या नेत्यांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या भागातून बाहेर जायचे नाही, असेही त्यांना सांगण्यात आले. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे कर्नाटकात वेगवेगळ्या भागात २५ एप्रिल रोजी प्रचार करणार आहेत. राहुल गांधी यांच्या २५ रॅली करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे.