पहिल्यापासून आतापर्यंतचे काँग्रेस अध्यक्ष; जाणून घ्या नेहरू-गांधी कुटुंबाकडे किती वर्ष होती धुरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 05:49 PM2017-12-11T17:49:42+5:302017-12-11T17:59:22+5:30
132 वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे देशातील 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या पक्षाची धुरा पुन्हा एकदा नेहरु-गांधी घराण्यातील सदस्याच्याच खांद्यावर देण्यात आली आहे.
मुंबई - काँग्रेसच्या इतिहासात सोनिया गांधी याच सर्वाधिक काळ सलग पक्षाध्यक्ष राहिल्या आहेत. यापूर्वी या घरातील मोतिलाल नेहरू, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी-नेहरु कुटुंबातील सहावे अध्यक्ष आहेत. 16 डिसेंबरला सकाळी 11 वाजता राहुल अध्यक्षपदाची सूत्रं हातात घेणार आहेत. 132 वर्ष जुन्या असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे देशातील 100 वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या पक्षाची धुरा पुन्हा एकदा नेहरु-गांधी घराण्यातील सदस्याच्याच खांद्यावर देण्यात आली आहे. नेहरु-गांधी कुटुंबाने काँग्रेसला आतापर्यंत पाच अध्यक्ष दिले आहेत. राहुल गांधी हे सहावे अध्यक्ष ठरले आहेत. 1978 पासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाकडे पाहिलं तर नेहरु-गांधी घराण्याचंच राज्य दिसतं. गेल्या 39 वर्षांपैकी 32 वर्षांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेहरु-गांधी घराण्यातील सदस्य आहेत.
मोतीलाल नेहरु -
नेहरु-गांधी कुटुंबातून सर्वात अगोदर मोतीलाल नेहरु 1919 साली पक्षाचे अध्यक्ष बनले. मोतिलाल नेहरू हे १९१९, १९२८ असे दोन वेळा काँग्रेसचे अध्यक्ष होते.
जवाहरलाल नेहरु -
जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू या नावानेही ओळखले जातात. मोतीलाल नेहरु यांच्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्याकडे 1929 साली ही धुरा देण्यात आली.
इंदिरा गांधी आणि राजीव गांधी -
गांधी-नेहरु यांची तिसऱ्या पिढीत 1959 साली दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पहिल्यांदा पक्षाध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यानंतर 1974 ते 1984 या काळात त्यांनी पक्षाध्यक्ष म्हणून काम पाहिलं. चौथ्या पिढीत राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसचं अध्यक्षपद देण्यात आलं.
1998 साली सोनिया गांधींची निवड
राजीव गांधी यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा सलग सात वर्षे नरसिंह राव आणि सीताराम केसरी यांच्याकडून 1998 साली पुन्हा एकदा नेहरु-गांधी कुटुंबातील सदस्याकडे आली. सोनिया गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. नेहरु-गांधी कुटुंबात पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांनी सर्वात जास्त काळ कामकाज पाहिलं आहे. त्यांच्यानंतर आता राहुल गांधी यांच्या हातात पक्षाची धुरा देण्यात आली आहे.
आतापर्यंतचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि त्यांचा कालावधी
1) आचार्य कृपलानी – 1947
2) पट्टाभी सितारामय्या – 1948-49
3) पुरुषोत्तमदास टंडन – 1950
4) जवाहरलाल नेहरु – 1951-54
5) यू. एन. धेबर – 1955-59
6) इंदिरा गांधी – 1959
7) नीलम संजीव रेड्डी – 1960–63
8) के. कामराज – 1964–67
9) निजलिंगअप्पा – 1968
10) जगजीवनराम – 1970–71
11) शंकर दयाळ शर्मा – 1972–74
12) देवकांत बरुआ – 1975-77
13) इंदिरा गांधी – 1978–84
14) राजीव गांधी – 1985–91
15) पी. व्ही नरसिंहराव – 1992–96
16) सिताराम केसरी – 1996–98
17) सोनिया गांधी – 1998 ते आजपर्यंत