Congress President: काँग्रेसमध्ये नवा ट्विस्ट; शशी थरुर होऊ शकतात पक्षाचे अध्यक्ष, सोनिया गांधींचा हिरवा कंदील?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 08:39 PM2022-09-19T20:39:33+5:302022-09-19T20:43:13+5:30
Congress President: शशी थरुर यांनी आज सोनिया गांधी यांची भेट घेतली, या भेटीनंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Congress President: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या (Congress President) निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. राहुल गांधी (Rahul Ganhdi) यांनी अध्यक्ष होण्यासाठी स्पष्टपणे नकार दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावे समोर आली होती. एकीकडे राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी अनेक राज्यात ठराव मंजूर केले जात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर (Shashi Tharoor) यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
Sonia Gandhi, Congress interim president, replied that he (Shashi Tharoor) can contest (for the post of the party president) if he wants, anybody can contest elections: Sources https://t.co/BV53ZXrSHz
— ANI (@ANI) September 19, 2022
राहुल गांधींचा नकार
2017 साली राहुल गांधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले होते, पण भाजपकडून 2019 मध्ये मिळालेल्या पराभवानंतर त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी (Sonia Gandhi) पक्षाच्या हंगामी अध्यक्ष झाल्या. आता काँग्रेसमध्ये निवडणुकीतून पक्षाध्यक्ष निवडला जाणार आहे, याची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू आहे. राहुल यांनी पक्षाध्यक्ष होण्यास नकार दिल्यानंतर अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली. यातच आता शशी थरुर यांचेही नाव चर्चेत आले आहे.
Congress MP Shashi Tharoor met party's interim president Sonia Gandhi in Delhi pic.twitter.com/dH8jy713GB
— ANI (@ANI) September 19, 2022
सोनिया गांधींच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर आज शशी थरूर यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. या बैठकीला काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. या भेटीनंतर शशी थरुर पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. स्वतः सोनिया गांधी यांनीच थरुर यांना निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दाखवल्याची माहिती मीडिया रिपोर्टसमध्ये करण्यात येत आहे. एएनआयनेही सूत्र्यांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. त्यामुळे आता शशी थरुर पक्षाध्यक्ष होतात का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.