Congress Presedent Election: 'मला पक्षात बदल घडवायचा आहे; त्यांच्यासारखा पराभूत झालो नाही', शशी थरूर यांचा खर्गेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 05:34 PM2022-10-13T17:34:30+5:302022-10-13T17:52:00+5:30
Congress Presedent Election:'22 वर्षांपासून निवडणूक झाली नाही, पक्षात अनेक त्रुटी आहेत. ज्यांना बदल हवाय, त्यांनी मला मतदान करावे.'
Congress Presedent Election:काँग्रेसमध्ये दीर्घकाळानंतर पक्षाध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. मल्लिकार्जुन खर्गे आणि शशी थरूर पक्षाध्यक्षपदासाठी रिंगणात आहेत. आज झालेल्या पत्रकार परिषदेत शशी थरूर यांनी पक्षांतर्गत समस्यांबाबत व्यथा मांडल्या. थरूर म्हणाले की, '22 वर्षांपासून पक्षात निवडणुका झाल्या नाहीत आणि पक्षांतर्गत नेत्यांमध्ये भेदभावही दिसून येत आहे. पक्षाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने खर्गे साहेबांसाठी काम केले आहे, त्यावरून भेदभाव दिसून येतोय.'
मला पक्षात बदल घडवायचा आहे
शशी थरूर म्हणाले की, 'ज्यांना पक्षात बदल हवाय, त्यांनी मला मतदान करावे. पक्षात सर्वकाही ठीक आहे, असे ज्यांना वाटते, त्यांनी मला मत देऊ नये. 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत दूर गेलेले मतदार माझ्या बाजूने यावेत. मला काँग्रेस पक्षात बदल घडवायचा आहे. मोठे नेते त्यांच्या बाजूने आहेत, पण कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. निवडणुकीचे निकाल धक्कादायक असू शकतात,' असा दावाही त्यांनी यावेळी केला.
काही नेते पक्षपात करत आहेत
थरूर यांनी यावेळी नेहरू-गांधी घराण्यापासून ते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मोहरमवरील वक्तव्यापर्यंत, अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले. थरूर म्हणाले की, 'मोहरममध्ये शोक व्यक्त करतात. पण, मल्लिकार्जुन खर्गे यांनी वेगळेच विधान केले. राहुल गांधी आणि गांधी परिवाराच्या इच्छेविरुद्ध काही नेते पक्षपात करत आहेत. मी काही पॅराशूटने आलो नाही. राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीत तीन वेळा विजयी झालो आहे. 2019 च्या निवडणुकीतही मी जिंकलो, तर मल्लिकार्जुन खर्गे पराभूत झाले आहेत,' असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.