Congress President Election: राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत; 'या' गोष्टीवरुन झाले स्पष्ट...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 06:53 PM2022-09-20T18:53:50+5:302022-09-20T18:54:46+5:30
Congress President: काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
Congress President Election:काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची (Congress President Election) प्रक्रिया 22 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. पक्षाचा पुढील अध्यक्ष कोण होणार, याबाबतचा सस्पेंस अनेक दिवसांपासून कायम आहे. अनेक राज्यातील काँग्रेस कमिट्यांनी राहुल गांधींना (Rahul Gandhi) पक्षाध्यक्ष बनवण्याची मागणी करणारा ठराव संमत केला आहे. मात्र, राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी भारत जोडो यात्रेच्या मध्यावरून परतणार नाहीत. सध्या पदयात्रा केरळमध्ये आहे. 23 रोजी थोडा ब्रेक घेऊन 29 रोजी यात्रा कर्नाटकात दाखल होणार आहे. काँग्रेसचा हा प्रवास 150 दिवसांत पूर्ण होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर आहे. नामनिर्देशनासाठी उमेदवाराने उपस्थित राहणे आवश्यक आहे. अशा स्थितीत सर्व राज्य समित्यांचा प्रस्ताव असूनही राहुल गांधी अध्यक्षपदासाठी उमेदवारी देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनेक राज्यांनी मंजूर केला प्रस्ताव
जम्मू-काश्मीर, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान यासह काँग्रेसच्या अनेक राज्यांनी राहुल गांधींना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा ठराव मंजूर केला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी अनेक नेत्यांची नावे पुढे येत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेदेखील निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. आज काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे.
17 ऑक्टोबर रोजी मतदान होणार
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना निवडणूक लढविण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ज्यावर ते म्हणाले होते की, 'मी काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही. माझ्या मनात कोणताही संभ्रम नाही.' दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीबाबत अधिसूचना जारी होणार आहे. 24 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नावनोंदणी प्रक्रिया चालणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.