Congress President Election: 'तुम्ही काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का?' शशी थरुर स्पष्टचं बोलले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 03:59 PM2022-08-30T15:59:03+5:302022-08-30T15:59:12+5:30
Congress President Election: शशी थरूर काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, ज्यांनी पक्ष नेतृत्वात बदलाची मागणी केली होती.
Congress President Election: काँग्रेस अध्यक्षपदाची (Congress President) निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. एकीकडे राहुल गांधी यांनी अध्यक्ष होण्यास नकार दिला आहे तर दुसरीकडे अध्यक्षपदाच्या शर्यतातीत अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. अशातचा तिरुअनंतपूरचे खासदार आणि ज्येष्ठ नेते शशी थरूर(Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात, असे बोलले जात आहे. या चर्चांवर स्वतः थरुर यांची प्रतिक्रिया आली आहे.
'मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात'
एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीतमध्ये शशी थरूर म्हणाले की, 'मला यावर भाष्य करण्याची गरज नाही. मी माझ्या लेखात जे लिहिले आहे तेच मी सांगेन. काँग्रेस पक्षात निवडणुका झाल्या तर पक्षाचेच भले होईल.' थरूर यांनी 'मातृभूमी' या मल्याळम दैनिकात एक लेख लिहिला आहे, ज्यामध्ये त्यांनी "मुक्त आणि निष्पक्ष" निवडणुकांचे आवाहन केले आहे.
Shashi Tharoor mum on contesting party president post, says "election good for Congress"
— ANI Digital (@ani_digital) August 30, 2022
Read @ANI Story | https://t.co/G6KD3CBTBz#ShashiTharoor#Congress#CWCMeetingpic.twitter.com/jA5EzUX8c7
या लेखात त्यांनी म्हटले की, 'पक्षाने काँग्रेस कार्यकारिणीच्या (CWC) डझनभर जागांसाठीही निवडणुका जाहीर केल्या पाहिजेत. AICC आणि PCC सदस्यांना पक्षातील या प्रमुख पदांचे नेतृत्व कोण करणार हे निवडण्याची परवानगी दिली पाहिजे.' विशेष म्हणजे, शशी थरूर हेदेखील काँग्रेसच्या G-23 नेत्यांमध्ये आहेत, जे पक्षात संघटनात्मक बदलाची मागणी करत आहेत.
काँग्रेस अध्यक्षाची नितांत गरज
थरूर यांनी आपल्या लेखात लिहिले की, "मला अपेक्षा आहे की, अनेक उमेदवार स्वत:चे विचार मांडण्यासाठी पुढे येतील. पक्ष आणि देशासाठी त्यांची दूरदृष्टी मांडल्याने जनहित नक्कीच जागृत होईल. पक्षाला सध्या नूतनीकरणासह एका चांगल्या अध्यक्षाचीही गरज आहे. पक्षाची सद्यस्थिती, भविष्यातील संकट आणि देशातीलचित्र पाहता अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणे आणि मतदारांना प्रेरित करण्याची दुहेरी जबाबदारी असेल. पक्षाच्या भावी अध्यक्षाकडे भारतासाठी एक व्हिजन असायला हवे.'
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक
पक्षांतर्गत गटबाजीचा सामना करत असलेल्या काँग्रेसने रविवारी पक्षाध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार असल्याचे जाहीर केले आहे. तर, निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबर रोजी जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 30 सप्टेंबरपर्यंत चालेल. अशी लोकशाही पद्धती पाळणारा हा देशातील एकमेव पक्ष असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.