Congress President Election: 'तुमचे दोन चेहरे, एक पक्षात अन् दुसरा मीडियासमोर', शशी थरूरवर काँग्रेस नेते संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 06:12 PM2022-10-20T18:12:14+5:302022-10-20T18:14:29+5:30
Congress Elections: मधुसूदन मिस्त्री यांनी शशी थरूरांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
Congress Slams Shashi Tharoor: निवडणुकीद्वारे मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. पण, शशी थरूर यांनी निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप केला आहे. पण, पक्षाने थरूर यांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिले. काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांनी, थरूर यांचे मुख्य पोलिंग एजंट सलमान सोज यांच्याद्वारे निशाणा साधला आहे.
मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, शशी थरूर यांच्या पोलिंग एजंटचे दोन चेहरे आहेत. एक माझ्या समोर होता, ज्यात आमच्या उत्तरांनी समाधानी होता. दुसरा, ज्यात तुम्ही मीडियासमोर हे सगळे आरोप करायला सुरुवात केली. आम्ही तुमची विनंती मान्य केली, तरीही तुम्ही केंद्रीय निवडणूक प्राधिकरणावर तुमच्याविरुद्ध कट रचल्याचा आरोप करत मीडियासमोर गेलात.
थरूर यांचा आरोप चुकीचा
शशी थरूर यांचे मुख्य पोलिंग एजंट सलमान सोज यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या मतदानादरम्यान अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. पोलिंग एजंटशिवाय पेट्या सील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सोज यांनी इतर राज्यांवरही मतदानाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता.
थरूर यांचे स्पष्टीकरण
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना लिहिलेले हे पत्र प्रसारमाध्यमांसमोर आल्याने हा वाद निर्माण झाला आहे. माध्यमांमध्ये लीक होत असलेल्या पत्रावर शशी थरूर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाला लिहिलेले अंतर्गत पत्र मीडियात लीक होणे दुर्दैवी आहे. वाढता वाद पाहून थरूर म्हणाले की, पक्षाध्यक्षाची ही निवड काँग्रेसला मजबूत करण्यासाठी आहे, फूट पाडण्यासाठी नाही.
24 वर्षांनंतर बिगर गांधी अध्यक्ष झाला
मल्लिकार्जुन खर्गे यांची 24 वर्षानंतर पहिल्यांदाच गैर-गांधी अध्यक्ष म्हणून निवड झाली. निवडणुकीत त्यांनी शशी थरूर यांचा पराभव केला. बुधवारी (19 ऑक्टोबर) आलेल्या निकालात खर्गे यांनी शशी थरूर यांचा 6825 मतांनी पराभव केला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खरगे यांना 7897 मते मिळाली, तर थरूर यांना 1072 मते पडली. मल्लिकार्जुन खरगे 26 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत.