VIDEO: तीन फुटांवरुन उलटा पडला फोटोग्राफर; विचारपूस करण्यासाठी धावले राहुल गांधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 01:00 PM2019-01-25T13:00:41+5:302019-01-25T13:17:10+5:30
राहुल गांधींच्या ओदिशा दौऱ्यादरम्यान भुवनेश्वर विमानतळावर घडली घटना
भुवनेश्वर: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी राहुल गांधी विमानानं भुवनेश्वरला पोहोचले. यावेळी एक फोटोग्राफर तीन फुटांवरुन पडला. ही बाब लक्षात येताच राहुल गांधी लगेचच फोटोग्राफरची विचारपूस करण्यासाठी धावले. राहुल यांनी फोटोग्राफरची विचारपूस केली आणि त्यानंतर नियोजित कार्यक्रमांसाठी पुढे रवाना झाले.
#WATCH Congress President Rahul Gandhi checks on a photographer who tripped and fell at Bhubaneswar Airport, Odisha. pic.twitter.com/EusYlzlRDn
— ANI (@ANI) January 25, 2019
राहुल गांधी ओदिशा दौऱ्यासाठी भुवनेश्वरमधील विमानतळावर उतरले. त्यावेळी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि फोटोग्राफर्सची मोठी गर्दी होती. त्यातील एक फोटोग्राफर जवळपास तीन-साडेतीन फुटांवरुन खाली पडला. यावेळी राहुल गांधींच्या आसपास विशेष सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गराडा होता. मात्र फोटोग्राफर खाली कोसळल्याचं पाहताच राहुल या गराड्यातून बाहेर पडले आणि फोटोग्राफरजवळ पोहोचले. त्यांनी त्या फोटोग्राफरची विचारपूस केली. त्यानंतर पुढील कार्यक्रमांसाठी विमानतळावरुन रवाना झाले.
राहुल गांधी आज ओदिशात जनसभेला संबोधित करणार आहेत. या माध्यमातून ते निवडणूक प्रचाराची सुरुवात करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा ओदिशाचे दौरे केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. गेल्या काही दिवसात ओदिशा काँग्रेसमधील नाराजी उफाळून आली आहे. दोन आमदारांसह अनेक वरिष्ठ नेत्यांना काँग्रेसला रामराम केला आहे. ओदिशात लोकसभेसोबतच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेला बळकटी देण्याची कामगिरी राहुल यांना पार पाडावी लागणार आहे.