टेम्पल रननंतर आता राहुल गांधींना आठवली अमेठीतील मंदिरं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 02:34 PM2018-12-18T14:34:45+5:302018-12-18T14:36:12+5:30
अमेठीतील मंदिरांवर राहुल गांधी प्रसन्न; निधीसाठी उघडला खजिना
अमेठी: नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसनं मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात भाजपाचा पराभव केला. या राज्यांमध्ये प्रचार करताना राहुल गांधींची 'टेम्पल रन' चर्चेत होती. काँग्रेसच्या विजयात राहुल गांधींच्यामंदिर भेटींचा मोठा वाटा होता. त्यामुळेच भाजपाच्या हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेत काँग्रेसनं विजय खेचून आणला. या तीन राज्यांमध्ये टेम्पल रनचा चांगला परिणाम पाहायला मिळाल्यानंतर आता राहुल यांनी अमेठीतील मंदिरांकडे लक्ष वळवलं आहे.
लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधींनी त्यांच्या मतदारसंघातील मंदिरांकडे विशेष लक्ष दिलं आहे. मतदारसंघातील अनेक मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी सध्या राहुल यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी या मंदिराना निधीची कमतरता जाणवू नये, यासाठी ते कामाला लागले आहेत. राहुल गांधींच्या या निर्णयाचं भाजपानं स्वागत केलं आहे. मात्र राहुल यांची नियत चांगली नसल्याची टीकादेखील केली आहे.
राहुल गांधींनी अमेठीतील अनेक मंदिरांना किर्तनासाठी आवश्यक हार्मोनियम, ढोलकी, टाळ आणि चिपळ्या अशी संगीतवाद्यं देण्याचा निर्णय घेतला आहे. तर गौरीगंजमधील दुर्गा मंदिरात सौरदिव्यांची व्यवस्था केली आहे. याशिवाय त्यांनी एका सामाजिक केंद्राच्या उभारणीसाठी सप्टेंबरमध्येच निधी मंजूर केला आहे. संग्रामपूरमधील कालिका देवी मंदिरातील प्रकाश व्यवस्थेसाठीदेखील निधी दिला आहे. राहुल यांच्या या निर्णयांमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपा आणि संघ राहुल यांच्या हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित करतात. राहुल यांनी त्यांच्या कृतीतून अनेकांना उत्तर दिल्याची चर्चा सध्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.