'संविधान बचाव रॅली'चं ट्विट करताना चुकले राहुल गांधी, करावं लागलं डिलीट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 09:17 AM2018-04-24T09:17:16+5:302018-04-24T09:17:16+5:30
रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली.
नवी दिल्ली- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी (23 एप्रिल) रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडिअममध्ये 'संविधान बचाव रॅली'ला संबोधित केलं. या रॅलीविषयी लोकांना माहिती देताना राहुल गांधींकडून चूक झाली. 'संविधान बचाव रॅली' विषयी ट्विट करून लोकांना माहिती देताना राहुल गांधी यांनी चुकीने 'संसद घेराव रॅली' असं ट्विट केलं. ट्विट करताना झालेली चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी काही वेळात ते ट्विट डिलीट केलं. व त्यानंतर 'संविधान बचाव रॅली'चं दुसरं ट्विट केलं.
भले देश होरपळू दे, मुलींवर बलात्कार होऊदेत, दलित व अल्पसंख्याकांच्या हक्कांवर गदा येत असेल पण नरेंद्र मोदी यांचे सारे लक्ष पुन्हा पंतप्रधान बनण्याकडेच लागलेलं आहे, अशा बोचऱ्या शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीका केली आहे. राज्यघटनेतील मूल्यांना मोदी सरकारच्या कारकीर्दीत धोका निर्माण झाला आहे. मात्र या मूल्यांच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे. मोदी सरकार सर्वोच्च न्यायालयाची गळचेपी करत असून संसदेतील कामकाजही बंद पाडले आहे, असंही ते म्हणाले.
देशातील विविध यंत्रणांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा भरणा केला जात आहे असा आरोप करून ते पुढे म्हणाले की, दलितांनी केलेल्या स्वच्छताकार्यामध्ये पंतप्रधानांना आध्यात्मिकतेचे दर्शन झाले. मात्र दलित, तसेच समाजातील दुर्बल घटक, महिला यांच्याविषयी पंतप्रधानांच्या मनात अजिबात कणव नसल्याचे देशाने पाहिले आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.