राहुल गांधी लालू प्रसादांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2018 01:19 PM2018-04-30T13:19:35+5:302018-04-30T13:19:35+5:30
राहुल गांधींनी एम्समध्ये लालू प्रसाद यांची भेट घेतली
नवी दिल्ली: चारा घोटाळा प्रकरणी तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या लालू प्रसाद यादव यांच्यावर सध्या दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एम्समध्ये जाऊन लालू प्रसाद यांची भेट घेतलीय. यावेळी राहुल यांनी लालू प्रसाद यादव यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. दोन्ही नेत्यांमधील ही भेट महत्त्वाची मानली जातेय. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या राहुल गांधींना राष्ट्रीय जनता दलाकडून पाठिंबा मिळताना दिसतोय.
काही दिवसांपूर्वीच लालू प्रसाद यांचा मुलगा तेजस्वी यादव यांनी एम्समध्ये वडिलांची भेट घेतली होती. याबद्दलची माहिती त्यांनी ट्विटवर दिली होती. 'दिल्ली एम्समध्ये काही क्षण वडिलांना भेटलो. त्यांच्या प्रकृतीबद्दल काळजी वाटते. त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झालेली नाही. वय वाढल्यानं त्यांची काळजी घेण्याची गरज आहे,' असं तेजस्वी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. 'लालू प्रसाद यादव यांच्यावर चांगल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही आमच्यासाठी आणि बिहारसाठी सुदैवाची बाब आहे. लालू प्रसाद लवकर बरे व्हावेत, अशी आम्ही प्रार्थना करतो,' असं तेजस्वी यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
चारा घोटाळ्याच्या अनेक प्रकरणांमध्ये तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव सध्या एम्समध्ये उपचार घेत आहेत. याआधी ते रांचीमधील तुरुंगात होते. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांना रांचीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर त्यांना एम्समध्ये हलवण्यात आलं. लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव 12 मे रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. मात्र या लग्न सोहळ्याला लालू प्रसाद उपस्थित राहणार की नाही, याबद्दलची निश्चित माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.