राहुल गांधींच्या विमानात तांत्रिक बिघाड, संगमनेरसह इतर सभांना होणार उशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 11:37 AM2019-04-26T11:37:58+5:302019-04-26T11:43:05+5:30
राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: च सभांना उशीर होणार असल्याचं ट्वीट केलं आहे. '
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील प्रचाराची सांगता जरी शनिवारी संध्याकाळी होणार असली, तरी शुक्रवारी वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांच्या सभांनी महाराष्ट्र ढवळून निघणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी (26 एप्रिल) संगमनेरमधील जाणता राजा मैदानात प्रचारसभा होणार आहे. मात्र पाटना येथील सभेला जात असताना राहुल गांधींच्या विमानात सकाळी तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे त्यांना पुन्हा दिल्लीला परतावं लागलं आहे. याच कारणामुळे संगमनेरसह दिवसभरातील इतर सभांना उशीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार करण्यासाठी पाटणा येथे जात असताना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यांच्या सभांना उशीर होणार आहे. राहुल गांधी यांनी स्वत: च सभांना उशीर होणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. 'आज पाटणा येथे जात असताना आमच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे आम्हाला दिल्लीला परतावं लागलं आहे. बिहारमधील समस्तीपूर, ओडिसामधील बालासोर आणि महाराष्ट्रामधील संगमनेर येथील सभांना यामुळे उशीर होईल' असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी माफीदेखील मागितली आहे. तसेच विमानातील व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
Engine trouble on our flight to Patna today! We’ve been forced to return to Delhi. Today’s meetings in Samastipur (Bihar), Balasore (Orissa) & Sangamner (Maharashta) will run late. Apologies for the inconvenience. pic.twitter.com/jfLLjYAgcO
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2019
मुंबईमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गुरुवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा रोड शो होणार होता पण तोदेखील झाला नाही. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी देशात काही ठिकाणी सभांना संबोधित करीत आहेत. राहुल गांधी यांच्या प्रचाराचा झंझावात देशभर सुरू आहे. मात्र, काँग्रेसच्या प्रचाराचे मुख्य आधारस्तंभ असलेले हे दोन्ही नेते मुंबईत प्रचाराला आले नाहीत. प्रियंका गांधी यांनी प्रचारात स्वत:ला उत्तर प्रदेशपुरतेच यंदा मर्यादित ठेवले. मुंबई काँग्रेसमधील एकमेकांशी भांडणाऱ्या नेत्यांकडे पक्षनेतृत्वाने दुर्लक्ष केले असा त्याचा अर्थ लावला जात आहे.
चलो संगमनेर! चलो संगमनेर! चलो संगमनेर!
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 26, 2019
कॉंग्रेस अध्यक्ष @RahulGandhi यांची लोकसभा निवडणूक प्रचारसभा
आज दि. २६ एप्रिल रोजी
सायंकाळी ६:३० वाजता
जाणता राजा मैदान, संगमनेर, अहमदनगर येथे.
मोठ्या संख्येने सहभागी व्हा! pic.twitter.com/owc3O8d4FH
'मोदी सरकारने 5 वर्षांत जनतेवर केला अन्याय, काँग्रेस देणार सर्वांना न्याय'
मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत देशातील जनतेवर प्रचंड अन्याय केला आहे. ‘अच्छे दिन आयेंगे'ची जागा आता ‘चौकीदार चोर है' या घोषणेने घेतली आहे, असे प्रतिपादन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केले होते. राजस्थानमधील मारवाड भागातल्या जालोर येथे प्रचारसभेत राहुल गांधी यांनी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकांनंतर काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वांना समान न्यायाने वागविले जाईल. आताचे सरकार जो भेदभाव करीत आहे, तो आमचे सरकार संपवेल. कर्जफेड न केल्याबद्दल जर श्रीमंतांना तुरुंगात पाठविले जात नसेल तर शेतकऱ्यांनाही कर्ज न फेडल्याबद्दल तुरुंगात पाठवणे बंद केले पाहिजे.
सरकार श्रीमंतांना लाखो, करोडो रुपये देत असेल तर तितकेच पैसे शेतकऱ्यांनाही मिळाले पाहिजेत, अशी आमची भूमिका असून, नोटाबंदी व जीएसटीच्या निर्णयाद्वारे मोदी यांनी श्रमिक, लहान व्यापारी, गरीब यांचे पैसे छिनावून घेतले. आमचे सरकार आल्यास आम्ही जनतेच्या मनातील गोष्ट जाणून घेऊ व त्याप्रमाणे कारभार करू, असे काँग्रेस अध्यक्ष म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने जाहीर केलेल्या न्याय योजनेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल व रोजगाराच्या आणखी संधी निर्माण होतील. काँग्रेस सत्तेवर आल्यास एका वर्षात २२ लाख सरकारी नोकऱ्या देऊ, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प मांडेल. विधानसभा, संसदेत तसेच सरकारी नोकºयांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊ अशी आश्वासने राहुल गांधी यांनी या सभेत दिली.