नाना पटोले यांची घरवापसी, राहुल गांधींच्या उपस्थितीत केला 'काँग्रेस'प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 02:58 PM2018-01-11T14:58:55+5:302018-01-11T15:41:46+5:30
नवी दिल्ली - भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंबंधीची माहिती ट्विट करण्यात आली आहे. भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले काँग्रेसप्रवेश करणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या होत्या. दुसरीकडे, काँग्रेसच्या इशाऱ्यावरच नाना पटोले यांनी राजीनामा दिला आहे, असा आरोप करीत भाजपाने पटोले यांच्या राजीनाम्याचे खापर काँग्रेसवर फोडले आहे.
आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यानेच राजीनामा-पटोले
संवैधानिक विरोधी काम करणाऱ्या केंद्र शासनाने युवक, शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब, शेत मजुरांसाठी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी व महिलांच्या न्याय हक्कासाठी माझ्या लढवय्या वृत्तीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यामुळे मी भाजपाच्या खासदारकीचा राजीनामा दिला. जनतेचा माझ्यावर असलेल्या विश्वासापोटी, प्रेमापोटी मी कुठेही असलो तरी त्याच जोमाने, ताकदीने आपले कार्य करीत राहील, अशी स्पष्टोक्ती माजी खासदार नाना पटोले यांनी केशोरी येथे आयोजित जाहीर सभेत दिली होती. यावेळी पटोले असंही म्हणाले होते की, केंद्र व राज्य सरकार जाती-जातीत तेढ निर्माण करुन महाराष्ट्र पेटविण्याचे काम करीत आहे. हे थांबविणे अत्यंत गरजेचे आहे.
Congress President Rahul Gandhi warmly welcomes Mr Nana Patole, Ex-MP from BJP, to the Congress family. pic.twitter.com/LZpHtlBS6Q
— Congress (@INCIndia) January 11, 2018
भाजपामध्ये पटोले का होते नाराज?
भाजपामधील सर्वच नेते, मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गोडवे गात असताना, पटोले यांनी मात्र त्यांच्यावरच टीकास्त्र सोडल्याने भाजपामध्ये भूकंप झाला होता. मे महिन्यात दिल्ली येथे पंतप्रधान मोदी यांनी राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत पटोले यांनी शेतकरी व ओबीसींचे प्रश्न उपस्थित केले. मात्र, मोदींनी त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांना बसायला लावले. तेव्हापासून पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.
नाना पटोले यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास
जिल्हा परिषद सदस्य ते लोकसभा सदस्य असा पटोले यांचा चढता राजकीय आलेख आहे. वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी १९८७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढविली. त्यानंतर, सलग तीन विधानसभा निवडणुका जिंकून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष त्यांनी वेधले. १९९४ची विधानसभा निवडणूक लाखांदूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढल्यानंतर, पुढच्या दोन्ही निवडणुका त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर लढविल्या आहेत. ‘नानाभाऊ’ या टोपण नावाने परिचित असलेले पटोले यांची एक ‘लढाऊ नेते’ अशीच ओळख आहे. राजकीय परिणामाची चिंता न करता, आजवर त्यांनी शेतक-यांच्या प्रश्नांवर स्वपक्षावर टीका करताना मागेपुढे पाहिले नाही.
काँग्रेसमध्ये असतानाही त्यांनी आघाडी सरकारच्या शेतक-यांप्रती उदासीन धोरणांविरुद्ध आवाज उठवून, डिसेंबर २००८मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, २००९ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढले आणि पराभूत झाले. जुलै २००९ मध्ये त्यांनी भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. २००९च्या साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवारीवर विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले. पुढे २०१४मध्ये भाजपाने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून त्यांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.