Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 05:02 PM2024-11-06T17:02:19+5:302024-11-06T17:02:54+5:30
Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.
केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील UDF आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भारतीय जनता पक्ष हा समानता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत देशाने फोडाफोडीचं राजकारण पाहिलं आहे, जिथे सत्ताधारी पक्षाने सत्तेत राहण्यासाठी लोकांचं लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांपासून वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा दावा प्रियंका यांनी केला.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्या एक 'योद्धा' आहेत आणि जर त्यांना संधी मिळाली तर त्या वायनाडच्या लोकांसाठी संसदेत आणि इतर प्रत्येक व्यासपीठावर लढतील जेणेकरून लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवता येतील. "मी मागे हटणार नाही. मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला निराश करणार नाही. आता आपण एक कुटुंब आहोत" असं ही प्रियंका यांनी म्हटलं आहे.
चेरुकोडे व्यतिरिक्त प्रियंका वनदूर विधानसभा मतदारसंघातील थुवूर आणि कालिकावू शहरांमध्ये आणि निलांबूर विधानसभेच्या पूकूट्टूमपदममधील सभांना संबोधित करणार आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधी या सात नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
मलप्पुरम जिल्ह्यातील वानदूर विधानसभेतील चेरुकोडे येथे एका सभेला संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा असे लोक राजकारणात शक्तिशाली बनतात तेव्हा ते लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष देत नाहीत. भाजपाच्या राजवटीत देशात शेतकरी किंवा मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कोणतीही आधार व्यवस्था नाही. लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतो, मात्र त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच आधाराची गरज आहे.