Congress Protest: काँग्रेस खासदारांसोबत गैरवर्तन, मारहाणही झाली; राहुल गांधींचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 01:07 PM2022-08-05T13:07:39+5:302022-08-05T13:08:18+5:30
Congress Protest: दिल्लीमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या नेतृत्वात केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन सुरू आहे.
नवी दिल्ली: महागाई, जीएसटीवाढ आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसचे देशभरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. राजधानी दिल्लीतही काँग्रेसचे अनेक नेते निदर्शने करत आहेत. यादरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काँग्रेसच्या सर्व नेत्यांसह राहुल महागाईविरोधात राष्ट्रपती भवनाकडे कूच करत होते. राहुलशिवाय शशी थरूर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. अनेक काँग्रेस नेते सध्या विजय चौकात धरणे धरून बसले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात कलम 144 लागू केले आहे.
#WATCH | Our job is to raise the issues of the people...Some Congress MPs detained, also beaten by police: Congress MP Rahul Gandhi during protest against price rise and unemployment at Vijay Chowk, Delhi pic.twitter.com/wWW7JojjjY
— ANI (@ANI) August 5, 2022
'काँग्रेस खासदारांना मारहाण'
राजपथजवळ आंदोलन करत असलेले राहुल गांधी म्हणाले, 'आमच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आमच्या खासदारांसोबत गैरवर्तन केले, त्यांना ओढले. काहींना यावेळी पोलिसांनी मारहाणदेखील केली. लोकशाहीची हत्या होत असल्याचे तुम्ही सर्व पाहत आहात. महागाईविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, पण केंद्र सरकार आम्हाला आंदोलन करू देत नाही." सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काँग्रेसचे आंदोलन सुरू आहे. काँग्रेस नेते राष्ट्रपती भवनापर्यंत कूच करत आहेत, तर पंतप्रधान भवनाचा घेराव करण्याची तयारी सुरू आहे. मात्र, घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त आहे.
#WATCH | Congress leader Priyanka Gandhi Vadra sits on a protest with other leaders and workers of the party outside the AICC HQ pic.twitter.com/ra6LPFhE0H— ANI (@ANI) August 5, 2022
प्रियंका गांधी वढेरा काँग्रेस मुख्यालयात
दुसरीकडे प्रियंकाही काँग्रेस मुख्यालयात पोहोचल्या आहेत. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी तीन थरांमध्ये पोलिस तैनात केले आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, 'देशातील महागाई अनियंत्रित झाली आहे. याबाबत सरकारने काही उपाय केले पाहिजे. महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत.' त्याचवेळी काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की, 'हा विरोध महागाई आणि अग्निपथबाबत आहे. महागाईचा फटका सर्वांनाच बसला आहे. राजकीय पक्ष असल्याने जनतेचा आवाज बुलंद करणे हे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत.
#WATCH | Congress MP Rahul Gandhi detained by police during a protest against the Central government on price rise and unemployment in Delhi pic.twitter.com/TxvJ8BCli9
— ANI (@ANI) August 5, 2022
फक्त जंतरमंतरवर आंदोलनाला परवानगी
दिल्ली पोलिसांनी काँग्रेसला पत्र लिहून जंतरमंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम 144 लागू असल्याचे सांगितले. अशा स्थितीत आंदोलनाला परवानगी देता येणार नाही. कलम 144 चे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. नवी दिल्ली क्षेत्राच्या डीसीपीने हे पत्र काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना 4 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टला लिहिले होते. माहितीसोबतच इशाराही देण्यात आला होता. तरीदेखील काँग्रेसने आंदोलन केल्यामुळे अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. विशेषत: पंतप्रधान निवासस्थान आणि सर्व व्हीव्हीआयपींच्या घराभोवती मोठा बंदोबस्त तैनात आहे.