Congress Protest: राहुल गांधीवरील कारवाईविरोधात काँग्रेसचा मशाल मार्च; पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 08:12 PM2023-03-28T20:12:46+5:302023-03-28T20:19:05+5:30
Congress Mashaal March: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याविरोधात काँग्रेसने दिल्लीत मशाल मार्च काढला.
Congress Protest March:काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवण्यावरुन काँग्रेसने सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी (28 मार्च) लाल किल्ल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मशाल मार्च काढण्याची घोषणा केली. याशिवाय बुधवारी देशभरात पत्रकार परिषदा होणार आहेत. त्यानंतर 29 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत स्थानिक पातळीवर 'जय भारत सत्याग्रह' केला जाणार आहे.
सायंकाळी उशिरा काँग्रेसने ‘लोकतंत्र बचाव मशाल शांती मार्च’ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखले. निषेध मोर्चा सुरू होण्यापूर्वी जेपी अग्रवाल यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना लाल किल्ल्याजवळ ताब्यात घेण्यात आले. मशाल मार्चला परवानगी नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Delhi | Congress leaders and workers were detained by police as they gathered at Red Fort for 'Loktantra Bachao Mashaal Shanti March' till Town Hall. https://t.co/xltww8xLZGpic.twitter.com/7Bhd5lvQ7S
— ANI (@ANI) March 28, 2023
लाल किल्ल्यासमोर गोंधळ
यानंतर लाल किल्ल्यासमोर मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी पांढरे कपडे जाळले. त्यानंतर पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. यावेली काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी पोलीस व्हॅनमध्ये बसवले. ताब्यात घेतलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना नवीन पोलीस लाईनमध्ये नेण्यात येत आहे.
दिल्ली काँग्रेस अध्यक्षांनी सुनावले
हुकूमशहा 'सत्य' आणि 'सत्याग्रह'ला घाबरतो, असे काँग्रेसने यावेळी म्हटले. काँग्रेसचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी म्हणाले की, आमच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लोकशाही वाचवण्यासाठी लोक आवाज उठवू शकत नाहीत, शांतता मोर्चा काढू शकत नाहीत. पोलीसही त्यांचेच आहेत. आम्हाला राजघाटावर जाऊ दिले जात नाही, संसदेत बोलू दिले जात नाही. विरोधकांनी जायचे कुठे ?