केवळ 'या' दोनच शब्दांत केंद्रीय निवडणूक आयोगावर राहुल गांधीची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 09:12 AM2021-04-04T09:12:14+5:302021-04-04T09:14:35+5:30
Rahul Gandhi on Election Commission: केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे.
नवी दिल्ली : आताच्या घडीला पश्चिम बंगाल आणि आसामसह ५ राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकांचा दुसरा टप्पा पार पडला. केरळ, तामिळनाडू, पुदुच्चेरी येथील प्रचार जोर धरू लागला आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका केली आहे. केवळ दोन शब्दांचे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकेचे आसूड ओढले आहे. (Rahul Gandhi on Election Commission)
राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर टीका केली आहे. Election “Commission” असे केवळ दोन शब्द राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहेत. राहुल गांधी यांच्या आधी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडले होते. पश्चिम बंगालमध्ये एका भाजप नेत्याच्या गाडीत ईव्हीएम यंत्र आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.
Election “Commission”.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 3, 2021
पश्चिम बंगालमध्ये प्रचार जोमात, अर्थव्यवस्था कोमात; रोजगारातही मोठी घट
कृषी कायदे रद्द करायला भाग पाडू
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हल्ल्याची शिकवण देतो, तर अहिंसात्मक सत्याग्रह शेतकऱ्यांना निर्भय बनवितो, असे प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. RSS चा एकजुटीने मुकाबला करून तीन कृषी कायदे केंद्रातील मोदी सरकारला रद्द करायला भाग पाडू, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या गाझिपूर, सिंघू आणि टिकरी सीमांवर हजारो शेतकरी गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून आंदोलन करीत आहेत. शेतकऱ्यांकडून तिन्ही कायद्यांना कडाडून विरोध केला जात असून, किमान आधारभूत किंमत या कायद्यामुळे संपुष्टात येईल अशी भीती व्यक्त केली जात आहे. या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या संपून शेतकऱ्यांना पूर्णत: उद्योगपतींच्या दयेवर अवलंबून राहावे लागेल, अशी भीतीही शेतकरी व्यक्त करीत आहेत.