Rahul Gandhi: “मोदानी मॉडल, आधी लुटा अन् मग कोणत्याही शिक्षेशिवाय सुटा”; राहुल गांधींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:14 PM2023-03-21T17:14:43+5:302023-03-21T17:15:28+5:30
Rahul Gandhi: विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते. मित्रांची मात्र सुटका केली जाते, अशी टीका राहुल गांधींनी केली.
Rahul Gandhi:काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी सातत्याने भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. संसदेत बोलू दिले जात नसल्याप्रकरणीही राहुल गांधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता मेहुल चोक्सीला इंटरपोल यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावरून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदानी मॉडेल असल्याचा खोचक टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. मेहुल चोक्सीला इंटरपोलच्या वाँटेड यादीतून वगळण्यात आले असून, जगात कुठेही आता ते फिरू शकतात, अशा आशयाच्या बातमीचा संदर्भ राहुल गांधी यांनी दिला आहे. यावरून विरोधकांच्या मागे ईडी-सीबीआयची चौकशी लावली जाते. मात्र, मित्रांची सुटका केली जाते. हे मोदानी मॉडेल असून, याचा अर्थ आधी लुटा आणि त्यानंतर कोणतीही शिक्षा झाल्याशिवाय त्या प्रकरणातून मुक्त व्हा, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.
मेहुल चोक्सीची रेड कॉर्नर नोटीस रद्द
इंटरपोलने मेहुल चोक्सी विरोधात 'रेड कॉर्नर' नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर तब्बल १० महिन्यानंतर ही नोटीस जारी करण्यात आली होती. त्याचवर्षी चोक्सीने अँटिग्वा तसेच बारबुडाचे नागरिकत्व स्वीकारले होते. मेहुल चोक्सीने या रेड कॉर्नर नोटिसीला आव्हान दिले होते आणि हे प्रकरण राजकीय षड्यंत्र असल्याचा दावा केला होता. मेहुल चोक्सीने आपल्या याचिकेत भारतातील तुरुंगातील परिस्थिती, त्याची वैयक्तिक सुरक्षा आणि आरोग्य यासारखे मुद्देही मांडले होते. चोक्सीच्या याचिकेनंतर हे प्रकरण पाच सदस्यीय इंटरपोल समितीच्या कोर्टात गेले. या समितीला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. सुनावणीनंतर या समितीने रेड कॉर्नर नोटीस रद्द केल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अदानी, नीरव मोदी, मेहुलभाईसारख्या उद्योगपती मित्रांसाठीच काम करतात. देशातील १४० कोटी जनतेसाठी नाही हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, हे सरकारच ‘हम दो, हमारे दो’चे सरकार आहे. एकीकडे राहुल गांधी देशाची लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत, जनतेचे प्रश्न घेऊन सरकारला जाब विचारत आहेत पण मोदी सरकार मात्र त्यांना काहीही करून अडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि भ्रष्ट उद्योगपतींना मात्र अभय दिले जात आहे. ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’, या म्हणीसारखा मोदी सरकारचा कारभार आहे, अशी टीका नाना पटोलेंनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"