“BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 17:02 IST2025-01-27T17:00:34+5:302025-01-27T17:02:39+5:30
Congress MP Rahul Gandhi News: BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत, असा दावा करत राहुल गांधी यांनी टीका केली.

“BJP-RSSला पारतंत्र्यातील भारत पुन्हा आणायचा आहे, अदानी-अंबानींना...”: राहुल गांधींची टीका
Congress MP Rahul Gandhi News: भारताला मिळालेले स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा टप्पा होता. कारण त्यानंतर पहिल्यांदाच देशातील दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि गरिबांना संविधानाद्वारे अधिकार मिळाले. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तसेच संविधानाची निर्मिती होण्यापूर्वी या देशात गरिबांना कोणतेच अधिकार देण्यात आलेले नव्हते. ही गोष्ट लक्षात ठेवा, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
एका सभेत बोलताना राहुल गांधी पुढे म्हणाले की, गरीब, दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना कोणतेही अधिकार नव्हते. केवळ राजे-महाराजे यांनाच अधिकार होते. मात्र, जेव्हा स्वातंत्र्य मिळाले, त्या दिवशी यात बदल झाला. तुम्हाला जमिनी देण्यात आल्या, जमिनीचे हक्क देण्यात आले, अधिकार देण्यात आले, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
हीच लढाई सुरू आहे, तुम्ही मुद्दा लक्षात घ्या
भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS यांना स्वातंत्र्यापूर्वी जशी परिस्थिती होती, तशी त्यांना पुन्हा आणायची आहे. पारतंत्र्यात जसे कोणालाही अधिकार नव्हते, फक्त अदानी आणि अंबानी यांसारख्या लोकांना अधिकार होते. पुन्हा तसाच भारत व्हावा, असेच त्यांना कायम वाटते. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते की, ते खरे स्वातंत्र्य नव्हते. कारण BJP आणि RSS संविधानाला मानत नाहीत. भाजपा आणि संघाला बहुजन आणि गरिबांचे हक्क आणि अधिकार काढून घेऊन त्यांना पुन्हा गुलाम करायचे आहे, असा मोठा दावा राहुल गांधी यांनी केला. हीच लढाई सुरू आहे. तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला गुलाम बनवले जात आहे. दलित, मागासवर्गीय, आदिवासी, गरिबांना पुन्हा गुलाम बनवले जात आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
दरम्यान, भारतात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. एका बाजूला संविधानावर विश्वास ठेवणारी आणि त्यासाठी लढणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला आरएसएस-भाजप आहे, जी संविधानाच्या विरोधात आहेत, ती विचारधारा संविधान कमकुवत करू इच्छिते. संविधान हे केवळ एक पुस्तक नाही, त्यात भारताची हजारो वर्षे जुनी विचारसरणी आहे. त्यात आंबेडकर, महात्मा गांधी, भगवान बुद्ध, महात्मा फुले यांसारख्या महापुरुषांचा आवाज आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीपूर्वीच राज्यघटना रद्द करण्याची भाषा वापरली होती. आम्हाला ४०० जागा मिळाल्या तर संविधान बदलू, असे ते म्हणाले होते. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते समोर उभे राहिले. त्याचा परिणाम असा झाला की, नरेंद्र मोदींना लोकसभेत संविधानापुढे झुकावे लागले, या शब्दांत राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.